सेवाकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी इच्छाशक्तीला कृतीची जोड आवश्यक : माननीय शांताक्का

    03-Feb-2025
Total Views |

Mananiya Shantakka - Rashtra Sevika Samiti

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Shantakka Bharatiya Stree Jeevan)
"कार्य करायची इच्छा प्रत्येकाची असते मात्र केवळ इच्छा असणे पुरेसे नाही. त्यासाठी कृतीची जोड आवश्यक असते. तरच कुठलेही सेवा कार्य पूर्णत्वास येईल." असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांनी केले.

हे वाचलंत का? : समरस समाज व जागृत नागरिक घडवेल 'विश्वगुरू भारत' : दत्तात्रेय होसबळे

भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेतर्फे सन २००२ सालापसून, राष्ट्र सेविका समितिच्या संस्थापिका व संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई (मावशी) केळकर आणि द्वितीय संचालिका वंदनीय सरस्वतीबाई (ताई) आपटे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गौरव पुरस्कार दिले जातात. तसेच मा. बकुळताई देवकुळे यांच्या स्मरणार्थ शुभेच्छा निधी दिला जातो. वसंत पंचमीचे औचित्य साधून यंदाचा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ रविवार, दि. २ फेब्रुवारी रोजी भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेचे मंदिर - सभागृह जिजामाता मार्ग, ठाणे (पूर्व) येथे संपन्न झाला.

उपस्थिताना संबोधत माननीय शांताक्का पुढे म्हणाल्या, प्रकृतीमध्ये होणारे सम्यक परिवर्तन समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करत असते. समर्पण भावनेने समाजकार्य करणाऱ्यांचा आज सन्मान होत आहे. भारतासारख्या पवित्र भूमीत मनुष्यजन्म घेणे अतिशय मोठी गोष्ट आहे. हा जन्म सार्थकी कसा लावायचा याचा प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण कुठलेही करिअर निवडले तरी निस्वार्थ भावाने त्यात काम केल्यास समाजात सकारात्मक वातावरण तयार होईल असे काम आज सर्वांनी करायचे आहे.


Mananiya Shantakka - Rashtra Sevika Samiti

यावेळी वंदनीय लक्ष्मीबाई केळकर पुरस्कार राष्ट्र सेविका समिति छत्तीसगड प्रांत प्रचारिका व अ. भा. सह घोष प्रमुख प्राची सुभाष पाटील यांना प्रदान करण्यात आला. वंदनीय सरस्वतीबाई आपटे पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका माधुरी जगदीश आफळे यांना प्रदान करण्यात आला. तर मा. बकुळताई देवकुळे यांचे स्मरणार्थ शुभेच्छा निधी आदिवासी उन्नती मंडळ बांधघर, डहाणू या सेवाभावी संस्थेला देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष कल्पेश गांगोडा सहपरिवार उपस्थित होते.

समारंभास प्रमुख अतिथी म्हणून टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल उपस्थित होते. भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.