रुपयाची गटांगळी सुरुच, डॉलरमागे ८७ रुपयांचा टप्पा ओलांडला

ट्रम्प प्रशासनच्या आयातशुल्कवाढचा फटका

    03-Feb-2025
Total Views |



ru

 
 

मुंबई : जागतिक पातळीवरील आर्थिक उलथापालथ शमण्याची शक्यता निर्माण झाल्याने रुपयाने डॉलरच्या तुलनेत वधारणे सुरु केले होते. परंतु थोड्याच काळात या वाढीला ब्रेक बसला. सोमवारी रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८७ रुपयांचा टप्पा ओलांडत पुन्हा एकदा नीचांकी तळ गाठला आहे. ट्रम्प प्रशासनाने विविध देशांवर लावलेल्या आयातशुल्कामुळे पुन्हा एकदा जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपया घसरायला लागला. सोमवारच्या एका दिवसात रुपयामध्ये ६७ पैशांची घट दिसून आली.

 

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, चीन, कॅनडा या देशांतील वस्तुंवर आयात शुल्क लावले आहे. त्यातील मेक्सिको आणि कॅनडा या देशांवर २५ टक्के तर चीन मधील वस्तुंवर १०टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. या आयात शुल्कामुळे अमेरिकेत या देशांकडून होणारी आयात आता महागणार आहे. या आयात शुल्क वाढीबरोबरच भारतातून परदेशी गुंतवणुक दारांनी आपली गुंतवणुक काढुन घेण्यास सुरुवात केल्यामुळेही रुपयावर दबाव वाढायला लागला आहे. यासगळ्याची परिणिती रुपयाच्या घसरणीत झाली आहे.

 

भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमके काय परिणाम होणार ?

 

भारतीय अर्थव्यवस्थेला रुपयातील घसरणीचा फटका बसणार असला तरीही तो तात्कलिक असून भारतीय अर्थव्यवस्थेला कुठलाही धोका नाही  असे अर्थतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडील परकीय चलनसाठा ५.५७ बिलियन डॉलर्सने वाढून ६२९. ५५ बिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या आता उद्धवलेल्या तात्कालिक संकटावर सहज मात करु शकेल असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. आताचे संकट तात्पुरते राहून रिझर्व्ह बँक आपल्या हस्तक्षेपाने या संकटावर उतारा शोधू शकेल.