रिलायन्स फाऊंडेशनकडून कुंभमेळ्यासाठी ‘तीर्थ यात्री सेवा’

खानपान, वैद्यकीय सेवेसह, यात्रेकरुंच्या सुरक्षेची घेणार काळजी

    03-Feb-2025
Total Views |



reliance


मुंबई : उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेला कुंभमेळा आतापर्यंतचा सर्वाधिक गर्दीचा मेळा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर रिलायन्स कंपनीने कुंभमेळ्यातील भक्तगणांसाठी तीर्थ यात्री सेवासुरु केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स फाऊंडेशनच्या यांच्या सहयोगातून ही सेवा सुरु केली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या वुई केअर या ब्रीदास साजेशी अशीच ही योजना आहे. या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी या तीर्थ यात्री सेवेचा मोठा लाभ होणार आहे.

 

रिलायन्स फाऊंडेशनच्या संचालिका नीता अंबानी यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, जेव्हा आपण तीर्थयांत्रींची सेवा करु शकतो तेव्हा आपल्यालापण त्याचे पुण्य मिळते. आमची सेवा ही यात्रेकरुंच्या सेवेसाठी तत्पर आहे. अशा हजार वर्षातून एकदा होणाऱ्या या महापर्वणीनिमित्त यात्रेकरुंच्या सेवेसाठी सादर आहे. आम्ही वुई केअर या तत्वज्ञानावर विश्वास ठेवतो. त्यामुळे महाकुंभात येणाऱ्या यात्रेकरुंसाठी वैद्यकीय मदत, खानपानाची सुविधा या सर्व सोयींच्या माध्यमातून लोकांची सेवा आम्ही करत आहोत.

 

या सेवेचा भाग म्हणून रिलायन्स फाऊंडेशन तर्फे यात्रेकरुंना मोफत गरम जेवण, शुध्द पाण्याची सुविधा, यात्रेकरुंना मदत करण्यासाठी हजारो स्वयंसेवक अशी सर्व सोय पुरवली जात आहे. याच बरोबर यात्रेकरुंना २४ तास वैद्यकीय मदत, डेंटिस्ट सारख्या सुविधा, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन्स पुरवण्याची सुविधा यासर्व गोष्टी पुरवल्या जाणार आहेत. तसेच वृध्द आणि दिव्यांग यात्रेकरुंसाठी व्हीलचेअर्स, येण्याजाण्याची सुविधा यासर्व गोष्टी पुरवल्या जाणार आहेत.

 

रिलायन्स फाऊंडेशनने यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनासोबत सहकार्य करत यात्रेकरुंसाठी पोलिस सुविधा, स्नानासाठी नदीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची सुविधा, स्नानासाठी जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी पाणपोलिस तसेच,बोटींची सुविधा यासर्वसुविधा देण्यात येणार आहेत.