मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ग्रह फिरलेले दिसतात. महाराष्ट्रातील पराभवाला जबाबदार धरीत काँग्रेस हायकमांडने त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे. अलिकडे पटोलेंनी केलेल्या जिल्हाध्यक्ष्यांच्या नियुक्त्या रद्द करीत, प्रदेश प्रभारींकडे सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
विधानसभेत काँग्रेस पक्षाची दाणादाण उडाल्यानंतर जमिनीवरच्या कार्यकर्त्यापासून तर थेट हायकमांडपर्यंत सर्वांनीच पटोलेंवर पराभवाचे खापर फोडले. लोकसभेतील विजयाने हवेत असलेल्या काँग्रेसला विधानसभेत अवघ्या १६ जागांवर यश आल्याने नेतृत्वावरच शंका उपस्थित करण्यात आल्या. शिवाय नेतृत्व बदलाच्या चर्चाही सुरु झाल्या. आता तर नाना पटोलेंच्या विरोधात पक्षांतर्गत कुरघोड्या सुरु झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र, आपल्या पदाचा राजीनामा देत असताना त्यांनी पक्षातील नेत्यांवर तोफ डागली. प्रदेश काँग्रेसमध्ये दोन नाना आहेत. त्यापैकी एका नानाने माझ्याकडे उमेदवारीसाठी ४ कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा रमाकांत म्हात्रेंनी केला. यात त्यांनी नानांचे नाव स्पष्ट केले नसले तरी यानिमित्ताने काँग्रेसमधील पैशांचा बाजार उघडा पडला.
या प्रकरणानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेड आणि नवी मुंबईतील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पटोलेंनी केलेल्या नियुक्त्या परस्पर रद्द केल्या. नानांनी नियुक्त्या करताना ऑल इंडिया कमिटीची परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवत चेन्निथला यांनी त्यांना दणका दिला. पण दुसरीकडे, चेन्निथला यांच्या या कृतीतून त्यांनी रमाकांत म्हात्रेंच्या आरोपांची गंभीर दखल घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अतिआत्मविश्वास नडला!
लोकसभेतील विजयानंतरचा अति आत्मविश्वास आणि संघटनात्मक नियोजनाचा अभाव हेच या काँग्रेसच्या पराभवाचं खरे कारण असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. नाना पटोलेंचा अतिआत्मविश्वास निवडणूकीत नडल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगल्या आहेत. या चर्चांपासून खुद्द पटोलेंचा गृहजिल्हादेखील सुटला नाही. त्यांच्या गृहजिल्ह्यात प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयीची खदखद आहे. याचा परिणाम असा की, त्यांच्या जिल्ह्यातील अनेक समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती आहे. पटोलेंच्या नेतृत्वावर वारंवार घेण्यात येणारी शंका आणि राज्यातील एकूणच काँग्रेसची सगळी परिस्थिती पाहता पक्षश्रेष्ठी अलर्ट मोडवर असल्याचे दिसते आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षश्रेष्ठींकडून पटोलेंना अलगद बाजूला सारण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....