घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा एसआयटी अहवाल तात्काळ प्रसिद्ध करा! किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
03-Feb-2025
Total Views |
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी स्थापन करण्यात आलेला एसआयटीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी पत्र लिहीले आहे.
दिनांक १३ मे २०२४ रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर बेकायदेशीर होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू होऊन अनेकजण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती. याप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याबाबत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, "यासंदर्भात तत्कालिन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरु केली आहे. कैसर खालिद यांनी भ्रष्ट पद्धतीने भावेश भिंडे यांच्या ईगो मीडिया कंपनीला हे होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी दिली होती. भावेश भिंडे याने कैसर खालिद परिवाराचे पार्टनर अक्षय अयुब यांना कोट्यावधी रुपये दिले असून ते कैसर खालिद यांच्या पत्नीच्या कंपनीमध्ये हस्तांतरित केले. या सगळ्याबाबची माहिती आणि कागदपत्रे मी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करणार आहे," असे त्यांनी सांगितले.
मालेगावातील बांग्लादेशींना परत पाठवणार!
"मी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव पोलीस स्टेशनला भेट देणार असून १ हजार बांग्लादेशी-रोहिंग्यांनी खोटे पुरावे आणि शपथपत्र देऊन जन्मप्रमाणपत्र मिळवल्याचे पुरावे देणार आहे. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील खोटे जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या सगळ्या बांग्लादेशी रोहिंग्यांवर कारवाई होणार आहे. मालेगाव पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या ३ हजार ९७७ बांग्लादेशी-रोहिंग्यांना बांग्लादेशला परत पाठवले जाणार आहे. त्यानंतर गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी अकोला आणि अमरावती पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येकी ४ हजार ८०० बांग्लादेशी, रोहिंग्यांच्या विरोधात तक्रार सुपूर्द करणार आहे," असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
संजय राऊत स्टंट मॅन!
"संजय राऊत हिंदी चित्रपटातील स्टंट मॅनप्रमाणे आहेत. रोज सकाळच्या पत्रकार परिषदेत कुठलेतरी वाक्य बोलून ते स्टंट करतात आणि दुसऱ्या दिवशी ते वाक्य विसरतात. त्यामुळे आम्हाला अशा स्टंटबाजीमध्ये सहभागी व्हायचे नाही. आम्ही अशा स्टंट वक्तव्यांकडे दुर्लक्ष करतो," अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली.