आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी व्यापक आणि परिणामकारक धोरणाची गरज! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

    03-Feb-2025
Total Views |

Fadanvis 
 
नागपूर : आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी व्यापक आणि परिणामकारक धोरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवार, २ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आदिवासी आरोग्य विषयक पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आदिवासी समाजाची जीवनशैली हजारों वर्षांपासून निर्गपूरक आहे. आदिवासी समाजाच्या आरोग्यविषयक गंभीर समस्या आहे. जवळपास ६५ टक्के आदिवासी महिलांना चांगल्या आरोग्यसेवेची गरज असून मोठ्या प्रमाणात कुपोषणाचा प्रश्नदेखील आहे. आदिवासी समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांबरोबर मिळून काम करण्याची गरज आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
सिकल सेल आणि मलेरियाचे वाढते प्रमाण चिंताजनक!
 
आदिवासी भागांमध्ये सिकल सेल आजार आणि मलेरियाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. यावप त्वरित उपाययोजनांची गरज आहे. गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन गडचिरोलीमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी २५ कोटींचा विशेष उपक्रम राबवत आहे. आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी व्यापक आणि परिणामकारक धोरणाची आवश्यकता असून शासन या संदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. तसेच यासाठी विशेष समिती स्थापन केली जाणार असून ही समिती संपूर्ण आरोग्य धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करेल. एम्स, विद्यापीठे आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे धोरण आकारास येईल," असेही त्यांनी सांगितले.