भारतीय वस्त्रोद्योगाला अर्थसंकल्पात गुंतवणुकीचा बूस्टर

03 Feb 2025 16:58:55




tex

 मुंबई :भारतीय वस्त्रोद्योगासाठी यंदाचा अर्थसंकल्प बऱ्याच अर्थांनी महत्वपूर्ण ठरला आहे. या अर्थसंकल्पात फक्त वस्त्रोद्योग या क्षेत्रासाठी तब्बल ५२७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय भारत सरकारने वस्त्रोद्योगासाठी ५ वर्षांची योजना आखली आहे. यातून या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना या क्षेत्राच्या तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. यामुळे भारताचे या क्षेत्रातील स्थान उंचावून भारत जागतिक पातळीवरील वस्त्रोद्योगाचे केंद्र बनणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
 
या तरतुदींमध्ये तब्बल ६३५ कोटींची तरतूद ही फक्त या क्षेत्रासाठी लागणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठी दिले जाणार आहेत. यामुळे फक्त कापड उत्पादक कंपन्याच नाही तर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे. यातून मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशांतर्गत वस्त्र निर्मिती, कापूस प्रक्रिया उद्योग, यासर्वालाच चालना मिळणार आहे. असा सरकारचा दावा आहे.
सध्या बांग्लादेश हा जागतिक पातळीवर वस्त्रोद्योगाचे केंद्र मानला जातो. जवळपास सर्वच जागतिक ब्रँड्सची निर्मिती ही बांग्लादेशात होते. आज बांग्लादेशात सुरु असलेल्या अंतर्गत यादवीमुळे बांग्लादेशचे जागतिक बाजारातील महत्व घटले आहे. हीच भारतासाठी सुवर्णसंधी असू शकते, भारतीय वस्त्रोद्योग अहवालानुसार जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या एका वर्षात भारताची अमेरिकेला होणारी वस्त्रोद्योगाची निर्यात ४.२५ टक्क्यांनी वाढून ४.४ बिलियन डॉलर्सवर गेली आहे. यामुळे भारताला हे क्षेत्र काबीज करण्यासाठी मोठी संधी आहे. त्यासाठी भारत सरकारने या उद्योगासाठी कच्च्या मालाची उपलब्धता, निर्यातीसाठी आर्थिक सहाय्य यासर्व गोष्टींची मदत करणे गरजेचे आहे असेही या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
भारत सरकारची ही योजना ग्रामीण भारताचे रुप पालटेल – आ. सुमित वानखेडे
भारत सरकारच्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळणार असून त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळेल. ग्रामीण भागातील तरुण –तरुणींना कौशल्य निर्मितीसाठीही याचा मोठा फायदा होईल. भारतात या सर्व क्षेत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र उभारणी करणे यांसारख्या गोष्टी केल्या पाहीजेत. यातून ग्रामीण अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने सशक्त होऊन विकासाची गंगा शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवणे शक्य होईल. असे मत आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुमीत वानखेडे यांनी मांडले.

 
 
 


Powered By Sangraha 9.0