महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारा!

03 Feb 2025 19:01:48
 
Aditi Tatkare
 
मुंबई : महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी दिले.
 
रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणे, तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज, राज्य बालहक्क संरक्षण आयोग तसेच १०० दिवस कृती आराखड्याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, ‘माविम’च्या कार्यकारी संचालक वर्षा लटा, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
 
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. हे भवन बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर उभारण्यात येणार असून यामध्ये ‘माविम’च्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त ‘माविम’ अंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातही त्यांचे कार्य पोहोचण्याकरिता राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करा," असे निर्देश त्यांनी दिले.
 
नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबवणार!
 
"श्रीवर्धन येथे सोलार फिश ड्राईंग प्रोजेक्ट अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत बाजारभिमुख उद्योग विकास घटकांतर्गत शेती, शेतीसंलग्न आणि बिगर शेती आधारित उद्योगांना तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासोबतच शहरासह ग्रामीण भागातही रोहा येथील गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचे युनिट सुरू करण्यात यावे. प्रकल्पासाठी पात्र महिलांना योग्य प्रशिक्षण आणि मानधन मिळण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली राबवावी. जास्तीत जास्त महिलांना या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करा," अशा सूचना त्यांनी दिल्या.
 
साहित्य‍िक बालकांना बाल महोत्सवात व्यासपीठ मिळणार!
 
"दरवर्षी बालगृह तसेच निरीक्षण गृहातील प्रवेशितांसाठी राज्यस्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत जी बालके कथा, कविता लिहितात, ज्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे अशा बालकांसाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे," असे निर्देश आदिती तटकरे यांनी दिले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0