'पाणी' नंतर आदिनाथ कोठारेच्या 'या' चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता!
03-Feb-2025
Total Views |
मुंबई : राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘पाणी’ चित्रपटाची कथा यातील गाणी थेट सामान्य माणसांच्या काळजाला भिडली. खेड्यापाड्यासह शहरांमध्येही अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदिनाथ कोठारेने केलं होतं, तर निर्मिती प्रियांका चोप्राने केली होती. ‘पाणी’ या चित्रपटाच्या यशानंतर आदिनाथ कोठारे एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आदिनाथने त्याचा आगामी चित्रपट 'बेनं' या चित्रपटाचं नावं त्याच्या सोशल मिडीयावर पोस्ट करुन एक नवं स्वप्न! एक नवा प्रवास सुरू! असं कॅप्शन देत त्याचा आनंद चाहत्यांसमोर मांडला.
आदिनाथ कोठारेने बेनं चित्रपटाची घोषणा केल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाच्या आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली आहे. चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार? चित्रपटाची कथा आणि गाणी कशी असणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सिनेविश्वातील अनेक कलाकारांसह चाहत्यांनी आदिनाथच्या या पोस्टवर कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे, तर एका चाहत्याने “पाणी चित्रपट बघितल्यानंतर आता आम्ही आतुरतेने वाट बघतोय… लवकर या राव…”, अशी कमेंट केली आहे.
आदिनाथ कोठारेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, १९९४ मध्ये आलेल्या ‘माझा छकुला’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदा काम केलं होतं. बालकलाकार म्हणून त्याच्या कामाचंही त्यावेळी अनेकांनी कौतुक केलं. त्यानंतर ‘वेड लावी जीवा’, ‘दुभंग’, ‘सतरंगी रे’, ‘झपाटलेला २’, ‘हॅलो नंदन’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘पाणी’ अशा चित्रपटांत त्याने काम केलं आहे. आता लवकरच तो ‘बेनं’ आणि ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या दोन आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.