पुणे : पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी मध्यरात्री गुनाट गावातून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे ऊसाच्या शेतातून जवळच्या एका घरात पाणी पिण्यासाठी आला आणि त्या घरातील महिलेने याबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गावकरांच्या मदतीने त्याला अटक केली. दरम्यान, आरोपीला लष्कर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून दुपारी त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे दोन दिवसांपासून फरार होता. तो गुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी १०० पोलिसांचा ताफा गुनाट गावात दाखल झाला.
पुणे पोलिसांनी आरोपीला फरार घोषित करत त्याची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते. ड्रोनच्या साहाय्यानेदेखील आरोपीचा शोध घेणे सुरु होते. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.