नवी दिल्ली: ( Yogi Adityanath ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा कुंभमेळ्याच्या समारोपानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये एक मोठी घोषणा केली आहे. महाकुंभात सहभागी असलेल्या उत्तर प्रदेशातील सफाई कामगारांना दहा हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस जाहीर केला आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सफाई कामगारांसोबत भोजनही केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाच्या समाप्तीनंतर स्वच्छता कामगार, आरोग्य कर्मचारी, नाविक, युपीएसआरटीव्ही चालक, पोलीस आणि प्रशासकीय अधिकार्यांशी थेट संवाद साधला. यादरम्यान, राज्य सरकारने प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात स्वच्छता आणि आरोग्य कर्मचार्यांना दहा हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलपासून स्वच्छता कर्मचार्यांना किमान १६ हजार रुपये वेतन दिले जाईल. कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांना थेट बँक हस्तांतरण दिले जाईल आणि त्या सर्वांना आरोग्य सेवांसाठी आयुष्मान भारत योजनेशी जोडले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
“महाकुंभाने उत्तर प्रदेशात आध्यात्मिक पर्यटनाचे अनेक सर्किट दिले आहेत,” असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “दि. १३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या काळात प्रयागराजमध्ये दररोज कोट्यवधी लोक येथे येत होते. त्याचप्रमाणे, काशी विश्वनाथ धामला दहा ते १५ लाख भाविक भेट देत होते. या काळात सात लाख ते १२ लाख भाविकांनी अयोध्येला भेट दिली, तर गोरखपूरमध्ये दि. १ जानेवारी रोजीपासून दररोज दोन लाख ते अडीच लाख भाविक येत होते,” याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.