मराठी ही जागतिक भाषा आहे. जगातील १२ कोटी लोक ही भाषा बोलतात. जगभरात मराठीचे पाईक असलेले शिलेदार तुम्हाला सापडतील. ही व्यवहाराची भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, तंत्रज्ञानाची भाषा आहे, अध्यात्माची भाषा आहे, संवादाची भाषा आहे आणि वेळ पडलीच, तर ‘हर हर महादेव’ म्हणत रणगर्जना करण्याचीही भाषा आहे. ‘एआय’पासून सर्व प्रवाह या भाषेने तत्काळ आत्मसात केले आणि म्हणून ही भाषा आज टिकून आहे, वृद्धिंगत होत आहे.
मराठीचा भव्यदिव्य सोहळा दिल्लीत नुकताच पार पडला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या एकूणच आयोजनाबद्दल साहित्यिक, रसिक, सर्व आयोजक, स्वयंसेवक यांचे मनापासून आभार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर हे संमेलन पार पडत होते, ज्या ठिकाणी एकेकाळी मराठेशाहीच्या छावण्या पडल्या होत्या, त्या दिल्लीत मराठी सारस्वत मराठीचा झेंडा सातासमुद्रापार नेण्यासाठी मंथन करण्यासाठी एकत्र यावेत, हा खरोखरच ‘कुंभयोग’ म्हणावा लागेल.
मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून माझ्या स्वतःसाठी हा मोठा गौरवाचा क्षण होता. मराठी साहित्य आणि साहित्यिकांनी नेहमीच देशाला दिशा दाखवली आहे. या भाषेत जसा गोडवा आहे, तसाच रांगडेपणाही आहे. सत्तेला चार शब्द सुनावायची शक्ती मराठी सारस्वतांमध्ये आहे. समाजातील अनिष्ट चालीरितींवर उघडपणे बोलण्याचे धैर्य या भाषेने जोपासले आहे. मी जरी सत्तेत असलो आणि साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर व्यक्त झालेल्या सर्वच मतांशी सहमत नसलो, तर अभिव्यक्तीचे हे सर्वोच्च व्यासपीठ जे सांगत आहे, त्याचा आदर करून ऐकण्याची शक्ती माझ्यात आहे. एकीकडे साहित्य संमेलन पार पडत असतानाच, साहित्यातील शोषित-वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनही पार पडले. प्रश्न विचारण्याची विद्रोही परंपरा हेच मराठी भाषेचे वैभव आहे. जगाच्या इतिहासात अशा परंपरा अभावानेच सापडतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ज्यांच्या कार्यकाळात मिळाला, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मराठीवरील प्रेम सर्वश्रुतच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडत असताना मराठीशी संपर्क आला आणि पंतप्रधानांनी ही भाषा आत्मसात केली, या भाषेवर प्रेम केले. अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न केले आणि हा दर्जा मिळवून दिला.
मराठी ही जागतिक भाषा आहे. जगातील 12 कोटी लोक ही भाषा बोलतात. जगभरात मराठीचे पाईक असलेले शिलेदार तुम्हाला सापडतील. ही व्यवहाराची भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, तंत्रज्ञानाची भाषा आहे, अध्यात्माची भाषा आहे, संवादाची भाषा आहे आणि वेळ पडलीच, तर ‘हर हर महादेव’ म्हणत रणगर्जना करण्याचीही भाषा आहे. ‘एआय’पासून सर्व प्रवाह या भाषेने तत्काळ आत्मसात केले आणि म्हणून ही भाषा आज टिकून आहे, वृद्धिंगत होत आहे. मराठीचा जागतिक पातळीवर प्रसार व्हावा, म्हणून आपण विविध देशांशी करार करत आहोत. जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये अध्यासने सुरू करण्यासाठी बोलणी सुरू आहेत. जगाच्या कानाकोपर्यात राहणार्या मराठी भाषकांच्या पुढच्या पिढ्यांना मराठी यावी, यासाठी विविध विद्यापीठांच्या माध्यमातून मराठी भाषा शिकवण्यासाठी अभ्यासक्रमांचीही निर्मिती केली जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषा जिवंत आणि वृद्धिंगत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. छत्रपतींच्या युद्धकौशल्य आणि गनिमी काव्याची ओळख जगाला व्हावी, म्हणून ‘जेएनयु’ला दहा कोटी रुपयांचा निधी देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच दि. 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या नावाने ’अध्यासन केंद्र’देखील ‘जेएनयु’मध्ये सुरू होणार आहे.
जगभरातील भाषांमध्ये विविध प्रवाह येत आहेत. नव्या पिढीची भाषा वेगळी आहे. ज्यांना आता ‘जेन झी’ म्हणून ओळखले जाते, त्यांची भाषा वेगळी आहे. बदलत्या प्रवाहांमध्येही मराठीची ओळख कायम राहावी, म्हणून विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. मराठीचा वापर वाढावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने प्रशासनात मराठी भाषा सक्तीची करण्याचा ऐतिहासिक निर्णयही घेतला. या निर्णयामुळे व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे. जगातील अनेक देश हे आपल्या मातृभाषेचा आग्रह धरतात. महाराष्ट्रातही मराठीचा आग्रह धरला गेलाच पाहिजे. काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक मराठीला दुय्यम लेखण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रात थारा नाही. मराठी भाषिकांनी नेहमीच इतर भाषिकांचा सन्मान केला आहे. पोटापाण्यासाठी स्थलांतर होते, त्यावेळी प्रत्येकजण आपली भाषा सोबत घेऊन बाहेर पडतो. पण, ज्या राज्याने आसरा दिला, रोजगार दिला, स्थैर्य दिले, प्रगतीचे पंख दिले, त्या राज्याच्या भाषेला योग्य सन्मानही दिला गेला पाहिजे. या आग्रहाला दुराग्रह म्हणता येणार नाही.
मराठी केवळ लिहिण्या-बोलण्याची नाही, तर जगण्याची भाषा आहे. मराठीपण जगत असताना विश्वातील मराठी जनांना एकत्र आणण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या ‘विश्व मराठी संमेलना’मुळे परदेशातील मराठी भाषिकांसाठीही एक दालन उघडे झाले आहे. मराठी जनांचा हा परिवार असाच वृद्धिंगत होत राहो, ही शुभकामना!