भाषेसाठी व्याकरण आवश्यक की अनावश्यक

    27-Feb-2025
Total Views |

marathi vyakaran  
  
(marathi vyakran) दि. २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा करण्यात आला, तर दि. २७ फेब्रुवारी रोजी आपल्या मातृभाषेचा म्हणजेच ‘मराठी भाषा गौरव दिन’ आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आलेला हा दिवस विशेषच गौरवाचा! वळवावी तशी वळणारी आपली मराठी भाषा. तिने अनेक बोलीभाषांना पोटात सामावून घेतले आहे. पण, या मराठी भाषेमध्ये असणार्‍या वळणांवर अनेक लोक धक्के खातात. ती वळणे म्हणजे मराठीचे व्याकरण! बोलीभाषा की प्रमाणभाषा, या वादाप्रमाणेच, व्याकरण आवश्यक की अनावश्यक, याचा यानिमित्ताने केलेला ऊहापोह...
 
बाबासाहेब पुरंदरे म्हणायचे, “भाषा ही केवळ शब्दांचा संग्रह नाही, ती आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे.” खरंच, भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, ती आपल्या विचारांची, भावनांची आणि परंपरांची वाहक आहे. परंतु, भाषेची खरी सौंदर्यस्थळे कोणती असतात? तिचा गोडवा, ओघवतेपणा आणि परिणामकारकता या सगळ्याचे मूळ तिच्या व्याकरणात आहे. कारण, व्याकरण हे मुळात भाषेला एकसंध ठेवते. कुठल्याही भाषेची शुद्धता आणि सुसूत्रता तिच्या व्याकरणावर अवलंबून असते. व्याकरणामुळे भाषा स्पष्ट होते, संवाद अधिक परिणामकारक होतो आणि विचारांना अधिक सुसंगतता प्राप्त होते. व्याकरणाशिवाय भाषा एकसंध होत नाही.
 
मराठी व्याकरणाची परंपरा अनेक वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे. याचा उगम संस्कृतच्या व्याकरणशास्त्रात आहे. पाणिनी यांच्या ‘अष्टाध्यायी’ या महान ग्रंथाने व्याकरणशास्त्राला एक शिस्तबद्ध रूप दिले आणि त्याचा प्रभाव पुढे मराठी भाषेवरही पडला. मराठीने सुरुवातीच्या काळात प्राकृत आणि अपभ्रंश यांच्यातून आपला प्रवास केला आणि त्याच काळात तिच्या व्याकरणाची मुळे अधिक दृढ झाली.मराठी भाषेच्या व्याकरणासंदर्भात पहिले लेखन हे महानुभाव संप्रदायातील कवी पंडित भीष्माचार्य यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ‘पंचवार्तिक’, ‘नामविभक्ति’ यांसारखी स्फुट प्रकरणे किंवा रामदासी संप्रदायातील गिरिधराने रचलेले छोटेसे ‘व्याकर्ण’ याखेरीज १६व्या शतकाच्या आधी मराठीचे व्याकरणलेखन झालेले नाही. मराठी भाषेचे व्याकरण लिहिण्याचे श्रेय दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना जाते. त्यांनी लिहिलेले ‘मराठी भाषेचे व्याकरण’ हे पुस्तक १८३६ साली प्रकाशित झाले होते. त्यांना ‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हणून ओळखले जाते. त्यानंतर महादेवशास्त्री जोशी, वामनशास्त्री भावे आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी व्याकरणाच्या अध्ययनात मोठे योगदान दिले. विशेषतः विसाव्या शतकात भाषाशास्त्रज्ञांनी आधुनिक मराठी व्याकरण अधिक सुटसुटीत आणि सहजसोपे करण्याचा प्रयत्न केला. प्रा. यास्मिन शेख, अरुण फडके, मो. रा. वाळिंबे यांनी मराठी व्याकरणाचे नियम संपादित करणे, सूत्रबद्ध करणे यासाठी योगदान दिले. विसाव्या शतकाला प्रारंभ झाल्यानंतर १९११ मध्ये मोरो केशव दामले यांनी लिहिलेला ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ हा मराठी व्याकरणात मेरूमणीप्रमाणे शोभणारा ग्रंथराज प्रकाशित झाला.
 
आजच्या डिजिटल युगात व्याकरण शिकणे अधिक सुलभ झाले आहे. अनेक अ‍ॅप्स, ऑनलाईन व्यासपीठे आणि साधने यामुळे व्याकरण शिकण्याची गती वाढली आहे. मात्र, त्याचबरोबर चुकीच्या भाषाशैलींचाही प्रभाव वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक व्याकरण आणि आधुनिक बदल यांचा समतोल राखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, ‘मराठी साहित्य महामंडळा’ने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक १४ नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये महामंडळाने यामध्ये आणखी चार नियमांची भर घातली. ‘मराठी साहित्य महामंडळ’ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे या महामंडळाने केलेल्या नियमावलीला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात व शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांत या नियमावलीचे पालन करण्याचे ठरवले. मराठीमध्ये आलेले संस्कृत तत्सम शब्द, तद्भव शब्द, तसेच प्राचीन मराठीतील शब्द आताच्या काळात लिहिताना होणारे बदल, उच्चारणानुसार होणार्‍या शब्दरचना, केशवसूतपूर्वकालीन पद्य आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या पूर्वीचे गद्य लिहितानाचे नियम सांगितलेले आहे. हे १८ नियम सार्वत्रिक मान्यता मिळालेले असून यानुसार प्रमाण मराठीचे लिखाण केले जाते. पण, भाषा सतत बदलत राहते आणि व्याकरणालाही त्या बदलांबरोबर लवचिकता ठेवावी लागते. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळातल्या अनेक शब्दांचा वापर आज कमी झाला आहे, तर इंग्रजी भाषेतील बरेच शब्द मराठीत रुजले आहेत. त्यामुळे नवीन भाषाशैलीसाठी काही प्रमाणात बदल आवश्यक असतात. मात्र, मूळ व्याकरणिक शिस्त टिकवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा भाषेचा गोंधळ उडू शकतो.
 
भाषा सुंदरच असते, पण योग्य व्याकरणामुळे ते अधिक प्रभावी, एकसमान होते. भाषा ही जरी संवादाचे माध्यम असले, तरी आपण मराठीचे सौंदर्य जपणारे व्याकरणही अनुसरूया. मराठी ही आपल्या मातृभाषेपेक्षा अधिक, ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. तिच्या सौंदर्याची आणि शुद्धतेची जबाबदारी आपलीच आहे. मराठी भाषा दिनानिमित्त आपण तिचे पावित्र्य जपूया!
 
वसुमती करंदीकर 
९१५६७४०७८१