मुंबई: पुणे अत्याचार घटनेतील आरोपीला फासावर लटकवणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी दिली.
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "पुण्यातील घटना अतिशय दुर्दैवी असून आपल्या लाडक्या बहिणीसोबत निंदनीय प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यात लक्ष घालून आहेत. मी स्वत: याबाबत पुणे पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. आरोपीचे सर्व लागेबांधे पोलिसांच्या हाती आले असून त्याला तात्काळ अटक होईल."
हे वाचलंत का? - कुठल्याही महिलेबद्दल बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही!
कुणाचीच गय केली जाणार नाही!
"लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त एसटीमध्ये प्रवास करता यावा म्हणून त्यांना ५० टक्के सवलत दिली. परंतू, अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. ज्या आगारात बंद पडलेल्या एसटी आहेत त्या सर्व गाड्या तात्काळ लिलावात काढाव्या, अशा सूचना दिल्या आहेत. तिथल्या सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नसून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल. लाडक्या बहिणी सुरक्षित राहाव्या हीच सरकारची भूमिका आहे. आरोपीचे कुणाशीही संबंध असले तरी त्याची गय केली जाणार नाही," असेही ते म्हणाले.