कुठल्याही महिलेबद्दल बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही!

27 Feb 2025 16:00:04
 
Chitra Wagh on Sanjay Raut
 
मुंबई : देशातील कुठल्याही महिलेबद्दल बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी केला आहे. पुणे अत्याचार प्रकरणी संजय राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
माध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "विश्वप्रवक्ते, सर्वज्ञानी संजय राऊत यांनी महिलांबद्दल न बोललेलेच बरे. त्यांनी जी भाषा वापरली त्याचा मी तीव्र निषेध करते. लाडक्या बहिणींची अब्रु तुम्ही विकत घेतली का? असे म्हणणाऱ्या राऊतांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. देशातील कुठल्याही महिलेबद्दल बोलण्याची त्यांची लायकी नाही. स्वप्ना पाटकर यांना तुम्ही ज्या पद्धतीने शिव्या दिल्या त्या संपूर्ण महाराष्ट्राने ऐकल्या आहेत. ज्यांनी वर्षानुवर्षे तुमच्यासोबत काम केले त्या तुमच्या सहकारी नीलमताई गोऱ्हे या महिलेबद्दल बोलतानाही तुमची जीभ अडखळली नाही. तुम्हाला महिलांबद्दल बोलण्याची नैतिकता नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे राजकारण दुसऱ्या बाजूने वळवल्यास बरे होईल. अन्यथा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी रस्त्यावर येऊन तुम्हाला चोपल्याशिवाय राहणार नाहीत," असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? -  सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य! मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना
 
राऊतांच्या डोक्यावर परिणाम
 
"ज्यांना महिलांची अब्रु, गरिमा आणि अस्मिता समजत नाही, जे प्रत्येकवेळी राजकारण करण्याची भूमिका घेत महिलांना पायातली चप्पल समजतात आणि महिलांविषयी घाणेरडे बोलणाऱ्या माणसाला महिलांच्या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही जामीनावर सुटलेले आरोपी असल्याने तुमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे," असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0