महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर येथील शेतकऱ्यांचे पावसावरचे अवलंबित्व कमी करायला हवे. शिवाराला पाणी दिले तर शेतमळे फुलतील आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, हे ओळखून त्यानुसार महाराष्ट्रात जलक्रांती घडवणारे नेते म्हणजे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) . आज २६ फेब्रुवारी त्यांचा स्मृतीदिन. या स्मृतिदिनानिमित्त अशोक चव्हाण यांसह अनेक नेत्यांनी शंकरराव चव्हाण यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.
अटलजींनी काढले होते गौरवोद्गार...
शंकरराव चव्हाण यांच्या अमृत महोत्सवी सत्कार प्रसंगी देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनीही गौरवोद्गार काढले होते. ते म्हणाले होते की, "शंकररावांचे परिश्रम, प्रयत्न, त्यांचा प्रामाणिकपणा, शिकाऊवृत्ती, त्यांचे प्रशासन कौशल्य हे तर वाखाणण्याजोगे आहेच, पण त्यांचे बेदाग, निष्कलंक चारित्र्य हे सर्वाच महत्त्वाचे आहे."
समाजकारणाची कारकिर्द
शंकरराव चव्हाण यांनी केंद्रात, राज्यात आपल्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला. नांदेडचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. या प्रवासा दरम्यान दोनदा मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी कर्तव्यनिष्ठेने सांभाळल्या. शंकरराव चव्हाण यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विशेष आस्था होती. त्यामुळे शेती, सिंचन आणि पाण्याच्या नियोजनाबाबतचे त्यांचे काम अतुलनीय आहे. भविष्यातल्या पाण्याचा प्रश्न लक्ष्यात घेवून त्यांनी अनेक योजना राबविल्या. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून १४ जुलै हा त्यांचा जन्मदिवस सिंचन दिवस म्हणून साजरा केला जातो. अश्या या जलनायकास स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!