संतोष देशमुख यांची हत्या कोण लाईव्ह पाहत होतं? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल

26 Feb 2025 15:38:19
 
bajrang sonwane press beed santosh deshmukh case
 
बीड : (Bajrang Sonwane Press Beed ) बीडमध्ये दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देत ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांची हत्या होत असताना लाईव्ह पाहिली जात होती, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल फोन्सची सिडिआर चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली आहे.
 
मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येला ७८ दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणी आरोपींना शिक्षा झालेली नाही तसेच या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे ही पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट दिली. यावेळी मध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पोलिसांनी अद्यापही आरोपींचे आणि या प्रकरणाची वेळेत नोंद न करून घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सीडीआर का तपासलेले नाहीत? निवडणुकीत असलेल्या उमेदवाराचे फोन तुम्ही टॅप करतात तर आरोपींचे सीडीआर का नाही काढत? असा सवाल खासदार सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.
 
संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यावर सर्व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत असताना आरोपाच्या भोवऱ्यात असलेल्या पोलीस निरीक्षक पाटील यांनाच कशी संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला? इतकंच नाही तर संतोष देशमुख यांना मारत असताना हा सगळा प्रकार लाईव्ह बघितला जात होता, ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे, असा खळबळजनक खुलासा यावेळी बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0