मुंबई : वाकोला पोलिस स्टेशनमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी त्यांनी बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये पोलिस उपायुक्त मनीष कलवानी यांची भेट घेतली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली.
हे वाचलंत का? - संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "सामाजिक कार्यकर्त्यावर अन्याय होणे आणि पोलिसांकडून त्यांना नाहक त्रास दिला जाणे हे धोकादायक आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणेने तत्काळ योग्य ती सुधारणा करणे आवश्यक आहे. या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी मी डीपीसींना केली आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली. यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आल्याचे डीपीसींनी मला सांगितले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून याचा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढील कारवाईबाबत विचार करू," असे त्यांनी सांगितले.
"एका जिहाद्याने दुर्गा वाहिनीच्या संयोजिकेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती वाकोला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा संयोजक जयकिशन प्रजापती यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर ते पोलिस स्टेशनमध्ये गेले असता त्यांना तु कशाला आला? तू मंत्री आहेस का? असे म्हणून पोलिसांनी त्यांना बाहेर हाकलून लावले. त्यानंतर पोलिस अधिकारी बाहेर आले आणि काहीही न विचारता जयकिशन प्रजापती यांना आत घेऊन जात त्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे या घटनेशी संबंधित ५ ते ६ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी आम्ही केली आहे. येत्या ६ दिवसांत त्यांचे निलंबन झाले नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू."
- गौतम रावरीया, बजरंग दल कोकण प्रांत सहसंयोजक