"मराठी कलाकारांचा सन्मान हवा, हिंदी चेहऱ्यांचे कौतुकच का?" अभिनेत्री अभिज्ञा भावेचं परखड मतं!
25-Feb-2025
Total Views | 38
मुंबई : मराठी मालिकांसह चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण केलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे नेहमीच परखड मतांसाठी प्रसिद्ध आहे. नुकतीच प्रसिद्ध निर्माती अमृता राव यांच्या मुलाखतीदरम्यान अभिज्ञाने मराठी इंडस्ट्रीबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. मराठी कलाकारांना योग्य सन्मान मिळतो का? हिंदी इंडस्ट्रीकडून मराठी कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असतो? यावर तिने परखड भाष्य केले.
"मराठी कलाकारांनी स्वतःच्या सिनेमांकडे पाठ फिरवू नये"
अभिज्ञाने मराठी सिनेसृष्टीच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना सांगितले की, "साऊथमध्ये मराठी इंडस्ट्रीबद्दल चर्चा होत नाही, पण तिथे कलाकारांना प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा असतो. मराठीत अनेक उत्तम संकल्पना, कलाकार आहेत, तरीही आपल्या इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष होते. हिंदी इंडस्ट्रीकडून मला अनेकदा ऑफर येतात, पण त्यावेळी सांगितले जाते की, ‘मॅम, आमचं बजेट एवढं नाहीये.’ कारण त्यांना माहिती असतं की, मराठी कलाकार पैशांपेक्षा कलेला जास्त महत्त्व देतात."
"मराठी सिनेमांना पाठिंबा का नाही?"
तिने पुढे प्रेक्षकांना सवाल केला, "आज जर तुम्ही फक्त साऊथ सिनेमेच पाहत असाल, मग मराठी सिनेमांचं काय? साऊथच्या सिनेमांसाठी लोक मोठ्या संख्येने जातात, पण मराठी सिनेमा आला की बुकिंग करण्याआधी विचार करतात. मराठी सिनेमांना ५०० रुपये देण्याची तयारी नसेल, तर आपण स्वतःला मराठी माणूस म्हणून कसं म्हणवून घेणार?"
"मराठी कलाकारांपेक्षा हिंदी चेहऱ्यांना प्राधान्य?"
अभिज्ञाने मराठी निर्माते-दिग्दर्शक यांच्यावरही सवाल केला, "आपल्या कलाकारांची दखल न घेता, मोठ्या बजेटमध्ये हिंदी कलाकार आणले जातात. मग हा आपल्या इंडस्ट्रीचा विकास म्हणायचा का?"
अभिज्ञाने आपल्या परखड विचारांतून मराठी सिनेमा आणि कलाकारांना अधिक संधी व सन्मान मिळावा, याची गरज स्पष्ट केली आहे.