आजपासून पात्र बहिणींना दिला जाणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता!

25 Feb 2025 14:13:06
 
ladki bahin yojana updates february installment
 
 
मुंबई : (Ladki Bahin Yojana) महायुती सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मह्त्त्वाची माहिती समोर आली आहे. ९ लाख महिलांच्या अपात्रतेबाबत तसेच फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात राज्य महिला व बालविकास मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
 
९ लाख अपात्र बहिणींचे १५०० रुपये बंद 
 
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत ९ लाख बहिणींना मिळणारा दीड हजार रुपयांचा मासिक हप्ता आता बंद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरु होती. या पडताळणीमध्ये सरकारद्वारे दिलेल्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना वगळण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला व बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आली होती. अर्ज छाननीदरम्यान ९ लाख अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामुळे सरकारचे १६२० कोटी रुपये वाचल्याची माहिती समोर आली आहे. एकापेक्षा जास्त योजनेचे लाभार्थी, चारचाकी असलेल्या तसेच २.५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्‍या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे. यापुढे या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 
आजपासून दिला जाणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता!
 
दरम्यान, पात्र महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होत्या. मात्र लवकरच त्यांची प्रतिक्षा संपणार आहे. महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आजपासून अर्थात २५ फेब्रुवारीपासून दिला जाणार आहे. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्गीकृत करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0