मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. ३७ वर्षांच्या संसारानंतर दोघंही विभक्त होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. वारंवार होणाऱ्या मतभेदांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
सुनीता आहुजाने गेल्या काही दिवसांत दिलेल्या मुलाखतींमध्येही गोविंदा तिच्यासोबत कुठेही दिसलेला नाही. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या अधिकच जोर धरू लागल्या आहेत. बॉलीवूड शादी या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा आणि सुनीता लवकरच घटस्फोट घेऊ शकतात.
दरम्यान, या प्रकरणाला नवे वळण देणारा दावा समोर आला आहे. त्यांच्या वृत्तानुसार, गोविंदाची एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी जवळीक असल्याने त्याच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. मात्र, याबाबत गोविंदाने आणि सुनीताने कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही.
अलिप्त जीवनशैलीचे संकेत?
सुनीता आहुजाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत स्वतः गोविंदासोबत राहत नसल्याचे सांगितले होते. “आमच्याकडे दोन घरं आहेत एक अपार्टमेंट आणि त्यासमोर एक बंगला. मी माझ्या मुलांसोबत फ्लॅटमध्ये राहते. गोविंदाला लोकांशी संवाद साधायला आवडतं, तो बंगल्यात राहतो आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवतो,” असे ती म्हणाली.
या सगळ्या घडामोडींमुळे गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्यात खरोखरच तणाव निर्माण झाला आहे का, की हे फक्त चर्चांचे वारे आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.