विद्यार्थी, विद्रोह अन् सत्तासुंदरी

25 Feb 2025 10:45:08

bangladeshi students who led anti-hasina protests, set to launch new political party
 
 
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या दीर्घकालीन सत्तेला संपुष्टात आणले. जगभरातील काही माध्यमांनी याला ‘ऐतिहासिक’ आणि ‘लोकशाहीचा विजय’ म्हणून सादरही केले. पण, खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे की, हा लोकशाहीचा विजय होता की सत्तांतराच्या प्रयोगाचा एक भाग? आणि हे विद्यार्थी नेते, ज्यांना आत्तापर्यंत ‘क्रांतीचे नायक’ म्हणून गौरवले जात होते, ते खरोखरच देश चालवण्याइतके सक्षम आहेत का? ‘नाहिद इस्लाम’ या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते, आता स्वतःचा पक्ष स्थापन करून सक्रिय राजकारणात उतरणार आहेत. आजवर ते युनूस यांच्या सरकारमध्ये सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळत होते. जगाचा इतिहास सांगतो की, विद्यार्थ्यांच्या चळवळींना साहजिकच सहानुभूती मिळते. कारण, हे विद्यार्थी देशाची तरुण पिढी, प्रामाणिक, ध्येयवादी अशा गोंडस प्रतिमेचे धनी असतात. त्यात बहुतांश असतीलही, मात्र प्रत्यक्षात या चळवळीमागे कोणाचे हात असतात? केवळ विद्रोहाच्या नावाखाली आंदोलन उभारणे आणि सत्ताधीशांना हटवणे फार सोपे असते. पण, सत्तेवर आल्यानंतर देश चालवण्याची जबाबदारी निभावणे याहून कठीण.
 
इतिहासात डोकावून पाहिले, तर जगभरात अशा विद्यार्थी चळवळींचा वापर सत्तांतरासाठी झालेला दिसतो. पण, त्यानंतर काय झाले? अनेक देश अराजकतेच्या गर्तेत ढकलले गेल्याचे दिसतात. बांगलादेशातही सध्या हेच चित्र. आंदोलन पेटले, सत्ता कोसळली. पण, नव्या सत्तेत आलेल्या सरकारने काही उजवी कामगिरी करणे राहिले दूरच, बांगलादेश अधिकच धर्मांध शक्तींच्या हातातील बाहुले झाला. त्यात आता हे विद्यार्थी नेते सक्रिय राजकारणात उतरण्याचे संकेत देत आहेत. तरुण राजकारणात येत असतील, तर निश्चितच कोणत्याही देशासाठी ती आनंदाचीच बाब! मात्र, बांगलादेशातील या नव्या अराजकतावादी विद्यार्थी नेत्यांकडे देशाचा कारभार हाताळण्याचा कोणताही स्पष्ट आराखडा अथवा पूर्वानुभव नाही. त्यांना आज कोणीही विचारले, “आर्थिक संकट कसे सोडवणार?” तर उत्तर मिळते, “हसीनांचे सरकार भ्रष्ट होते!” “परराष्ट्र धोरण काय असेल?” तर उत्तर असते, “हसीनांना कधीही माफ करणार नाही!” यावरून स्पष्ट होते की, यांच्या अजेंड्यात विकास नाही, तर केवळ आधीच्याच सत्ताधार्‍यांचा निषेध ठासून भरला आहे.
 
या नव्या अराजकतावादी विद्यार्थी नेत्यांचे अजेंडे केवळ सरकार बदलण्यापुरते मर्यादित नसून, आता ते बांगलादेशच्या राष्ट्रीय अस्मितेवरच घाला घालण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी बांगलादेशचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत बदलण्याचीही मागणी लावून धरली आहे. ही मागणी केवळ एक राजकीय खेळी नसून, याला बांगलादेशच्या मूळ ओळखीलाच पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. पण, ही मागणी नेमकी कशासाठी? या मागणीच्या मुळाशी कोणते विचार आहेत? त्यामागे कोणाचा दबाव आहे? आणि सर्वांत महत्त्वाचे जर देशाची ओळखच नष्ट करायची असेल, तर मग हे विद्यार्थी खरोखरच बांगलादेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहेत का? की त्यांच्या मागे काही अन्य शक्ती कार्यरत आहेत? याचाही विचार होणे आवश्यक आहे.
 
सरकार कोणीही पाडू शकतो. पण, सरकार चालवण्यासाठी अनुभव, दीर्घकालीन योजना आणि धैर्य लागते. विद्यार्थी म्हणून क्रांती करणे आणि राजकीय नेतृत्व करणे यात मोठा फरक आहे. अशा गोंधळ घालणार्‍या क्रांतिवादी चळवळी फार काळ टिकत नाहीत. बांगलादेशातील नागरिकांनी एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, केवळ आंदोलन करणारे उद्या देश चालवू शकतील का? हे अराजकतावादी सत्तेवर आले, तर देशाचा कारभार कोणत्या दिशेने जाईल? कारण देश उभारण्याचे काम कोणत्याही जोशाने किंवा घोषणांनी होत नाही. त्यासाठी परिपक्वता लागते, दूरदृष्टी लागते आणि विकासाचा खरा आराखडा लागतो. क्रांतीच्या गोंधळात आपण कुठल्या दिशेने जात आहोत, हे लक्षात घेतले नाही, तर पुढे भीषण अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशाला केवळ नवीन चेहरे नकोत, तर परिपक्व नेतृत्व हवे आहे. विद्यार्थ्यांनीही आंदोलनाच्या नावे भावनांच्या लाटेत वाहून न जाता, भविष्याचा विचार करून योग्य दिशा ठरवण्याची गरज आहे.
 
 
कौस्तुभ वीरकर
 
Powered By Sangraha 9.0