मुंबई : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबाजवणीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची माहिती कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात दिली.
याविषयी बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, "प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल असून राज्यात एकूण २२ हजार ०१० प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक १ हजार ८९५ प्रकल्प मंजूर आहेत. तर अहिल्यानगर दुसऱ्या आणि सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात २ हजार २६३ कोटीची गुंतवणूक झाली असून लाभार्थींना ३८९ कोटीचे अनुदान देण्यात आले आहे. देशात २२ हजारांचा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून यात ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.
हे वाचलंत का? - आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास साधणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
बिहार दुसऱ्या तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर
बिहारमध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे २१ हजार २४८ प्रकल्प मंजुर असून ते देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच उत्तर प्रदेशचे १५ हजार ४४९ प्रकल्प मंजूर असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नव्याने स्थापन होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तरवृद्धी, आधुनिकीकरणासाठी बँक क्रेडिट लिंक्ड सबसिडी दिली जाते. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणुकीसाठी वैयक्तिक, गट लाभार्थी, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, मूल्य साखळी, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल, मार्केटींग आणि बॅन्डींग इत्यादी घटकाकरिता अर्थ सहाय्य देण्यात येते. या योजनेंतर्गत राज्यात ४ हजार ३६९ तृणधान्य उत्पादने, ३ हजार ५२२ मसाले उत्पादने, ३ हजार २४२ भाजीपाला उत्पादने २ हजार ७२३ कडधान्य उत्पादने, २ हजार १६० फळ उत्पादने, २ हजार ९९ दुग्ध उत्पादने, ८३० तेलबिया उत्पादने, ५५३ पशुखाद्य उत्पादने, ५२३ तृणधान्य उत्पादने, ४४६ ऊस उत्पादने, १२० मांस उत्पादने, ९८ वन उत्पादने, ४१ लोणचे उत्पादने, ३९ सागरी उत्पादने आणि १ हजार ३१२ इतर उत्पादनांसाठी प्रकल्प मंजूर झाले आहेत.
योजनेसाठी अर्ज कसा करणार?
या योजनेंतर्गत अर्जदारास वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थी आणि सामाईक पायाभूत सुविधा या घटकांसाठी www.profme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी www.nrim.gov.in आणि शहरी भागासाठी www.nutm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.