मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Wasim Rizvi Arrest News) जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील न्यायालयाने उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (जितेंद्र नारायण त्यागी) यांच्याविरोधात अटकेचे आदेश दिले आहेत. त्यांच्याविरोधात असा आरोप आहे की, त्यांनी लखनौ येथे पत्रकार परिषदेत इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी केली होती. मात्र २०२२ पासून सुरू झालेल्या या खटल्याची १० पेक्षा जास्त वेळा सुनावणी झाली असून या काळात जितेंद्र नारायण त्यागी हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक करून हजर करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.
हे वाचलंत का? : प्रयागराजला जाताना भाजप प्रवक्त्या नाझिया खान यांच्या गाडीवर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार श्रीनगर कोर्टाने २० फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, वारंवार समन्स बजावूनही जितेंद्र त्यागी हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यागींना अटक करण्यासाठी पोलिकांचे एक पथक तयार करण्यास सांगितले असून दि. २५ एप्रिल पर्यंत कारवाई करण्यास सांगितले आहे. जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांनी काही वर्षांपूर्वीच इस्लाम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारला होता. त्यांच्या मते, त्यांनी यापूर्वी केलेल्या विधानांमुळे त्यांना इस्लाममधून बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर आपण कोणता धर्म स्वीकारायचा हा त्यांचा निर्णय होता आणि यामुळेच त्यांनी सनातन धर्म निवडला. त्यानंतर विधिवत पद्धतीने त्यांची घरवापसी झाली. जितेंद्र त्यागी हे सतत इस्लामवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत असतात. त्याच्यावर इतरही अनेक प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.