Chhaava Box Office Collection Day 9 : छावा चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी विक्रम प्रस्थापित केला, एकाच दिवशी सर्वाधिक कमाई!

23 Feb 2025 11:22:30

chaava box office day 9



मुंबई : विकी कौशलचा छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या छावा या चित्रपटाने प्रदर्शानंतर प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. मराठी साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट आहे, ज्यामध्ये मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना (येसूबाई भोसले), अक्षय खन्ना (औरंगजेब), दिव्या दत्ता (राजमाता सौयराबाई भोसले), आशुतोष राणा, डियाना पेंटी, विनीत कुमार सिंह यांसारखे नामांकित कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
दिवस ९ बॉक्स ऑफिस कलेक्शन:

दुसऱ्या शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी  तब्बल २३.५ कोटींची कमाई केल्यानंतर, छावा चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी जवळपास ८५% वाढ दर्शवली. सकनीलकच्या अहवालानुसार, या दिवशी चित्रपटाने  ४४ कोटींची कमाई केली असून एकूण कमाई २८६.७५ कोटींवर पोहोचली आहे.
२०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा शनिवार
दुसऱ्या शनिवारी ४४ कोटींची कमाई करत छावाने २०२५ मधील दुसऱ्या शनिवारी सर्वाधिक कमाईचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यासोबतच, छावा हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा नवव्या दिवशीचा चित्रपट ठरला आहे.
विकी कौशलची प्रतिक्रिया:

एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये छावा चित्रपटाविषयी बोलताना विकी कौशल म्हणाला, "माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे की मला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. लक्ष्मण उतेकर आणि दिनेश विजन सरांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रातील प्रत्येकाला संभाजी महाराजांचा इतिहास ठाऊक आहेच, पण आमची इच्छा आहे की संपूर्ण भारतात आणि जगभरातील प्रत्येक घरात, प्रत्येक मुलाला आपले छत्रपती कसे होते हे समजावे."
छावाच्या या अफाट यशानंतर आता हा चित्रपट पुढील आठवड्यात ₹३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.


Powered By Sangraha 9.0