मुंबई : (Mumbai Coastal Road) तब्बल १ हजार ४०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कोस्टल रोडला भेगा पडल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, हे ‘उबाठा’चे पाप असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याविषयी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस अमेय घोले म्हणाले, हाजी अली ते वरळीपर्यंतच्या कोस्टल रोडच्या पॅचवर्कबाबत अपप्रचार करणाऱ्यांना सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे टेंडर आणि कंत्राट २०१६-२०१७ मध्येच दिले गेले होते. प्रत्यक्ष काम २०१८ मध्ये सुरू झाले. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर विद्यमान सरकारला दोष देणे, म्हणजे आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याचा हास्यास्पद प्रयत्न आहे.
‘उबाठा’ गटाने आधी स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कारनाम्यांकडे पाहावे. त्यांच्या पक्षातील किती पदाधिकारी हे कोस्टल रोड प्रकल्पासाठी कच्चा माल पुरवणारे ठेकेदार होते? यावर एक सखोल चौकशी व्हायला हवी. त्यांच्या पक्षाचे विद्यमान सचिव थेट कंत्राटदारांशी संपर्क साधून ‘सब-कॉन्ट्रॅक्ट’ देण्याबाबत दबाव आणत होते. त्यामागचे सत्य काय आहे? यावरसुद्धा एक सखोल चौकशी व्हायला हवी, असा गौप्यस्फोट अमेय घोले यांनी केला.
मुंबईकरांसमोर खरी माहिती उघड व्हावी
माझी स्पष्ट मागणी आहे की, हाजी अली कोस्टल रोड प्रकल्पातील सर्व कच्चा माल पुरवठादारांची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. मुंबईकरांना खरी माहिती मिळावी, कोणीही जनतेच्या पैशांचा गैरवापर करून सुटू नये, हीच आमची भूमिका आहे. यात राजकारण करण्याचा प्रश्न नाही.
- अमेय घोले, शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस