जळजळतय...

22 Feb 2025 10:12:53

ubt and ncp-sp plays dirty politics
 
महाराष्ट्रात युतीचे सरकार दगाबाजी करून घालविल्यानंतर जे काही घाणेरडे राजकारण उद्धव ठाकरे गटाच्या आणि शरद पवार गटाच्या लोकांनी राज्यात सुरू केले आहे, ते अतिशय लाजिरवाणे आणि महाराष्ट्रातील सभ्य राजकीय संस्कृतीला अशोभनीय असेच आहे. त्यामुळे त्यांची सत्ता उपभोगता न येण्याची आणि सत्ता घालवावी लागल्याची चीडचीड, आता रोज कोणत्या ना कोणत्या तर्‍हेने गरळ ओकल्यासारखी बाहेर येत राहते. अधूनमधून एक जाहिरात दूरदर्शन वाहिन्यांवर झळकत असते. त्यातील ‘जळजळतय... मळमळतय...’ हे प्रभावीपणे मांडलेले संवाद, या उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला अगदी तंतोतंत लागू पडतात. सकाळी उठणारा भोंगा तर चाळीतल्या सार्वजनिक शौचालयाकडे लागलेल्या रांगेतील लोकांसारखा भासायला लागला आहे, एवढे विद्रुप रूप या राजकीय जळजळीने घेतल्याचे अलीकडे दिसून येत आहे. बोलण्याचे स्वतंत्र्य मिळाले म्हणून काहीही बोलत सुटायचे, याची जणू या दोन पक्षांच्या लोकांमध्ये स्पर्धाच लागली आहे. मग ते समाजमाध्यमांतून त्यांचे व्यक्त होणे असो की, वाहिन्यांपुढे येत बोलणे असो. राजकीय संस्कृतीला चुकीच्या मार्गावर नेणारे हे लोक कधी सुधारतील, याचीच आता जनता वाट बघत आहे. कारण, ना त्यांच्या बोलण्याला अर्थ असतो आणि ना त्यातून काही राज्याच्या अथवा देशाच्या हितचे साध्य होत असते.
 
सकाळी उठून किंवा वाहिनीमधील माणसे आली की, वाटेल तसे बोलत सुटायची लागलेली सवय, आता अतिशय वाईट व्यसनाचे रूप घेत आहे की, काय अशी शंका घ्यायलादेखील वाव निर्माण झाला आहे. भाषण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरकच दोन्ही गटातील लोकांच्या लक्षात येईनासा झाला आहे. याच लोकांनी बरळण्यापेक्षा, राज्याच्या हितासाठी बोलायचे ठरविले तर त्यातून मंथन होत, नक्कीच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारसोबत आपण या राज्याचे हितकरी आहोत, असे मिरवायची संधी या लोकांना आहे. मात्र, एकाला आयता मिळालेला राजकीय वारसा आणि एकाची आयुष्यभर कुणाच्या ना कुणाच्या घरात काड्या करीत राजकारण करण्याची घातक प्रवृत्ती, यामुळे या लोकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा अंत जवळ बोलावला आहेच. तसेच, त्यांच्या या जळजळीने लोकांनादेखील नाहक त्रासाला सोसावे लागत आहे.
 
 
मळमळतय...
 
 
 
राज्यात विरोधक आहेत की नाही अशी स्थिती असताना, जे काही चार, दोन मोजकी लोकं शिल्लक आहेत, ते आपली मळमळ नेहमी बाहेर काढीत असल्याचे आजकाल दिसून येत आहे. ही मळमळ केवळ राजकीय विरोधापुरतीच असल्याने, त्यातून स्वार्थाचीच दुर्गंधी बाहेर येत आहे. एकनाथ शिंदे बाहेर का पडले, याचे आत्मचिंतन करायचे सोडून, काहीबाही अतिशय हास्यास्पद बोलण्यातच उद्धव ठाकरे माहिर आहेत, हेच नेहमी सिद्ध करीत असतात. मी धक्का मॅन आहे, असे अजब विधान करून त्यांनी यात भर घातली आहे. आपले काय चुकले यापेक्षा आपल्या नाकावर टिच्चून बाहेर पडलेल्या आपल्याच एकेकाळच्या सहकार्‍यांची उणी-दुणी काढण्यात, हे उबाठा आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (शप) गट आपली हयात घालविणार असल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. नेहमी बाहेर पडलेल्या लोकांबाबत बोलून, आपली मळमळ बाहेर काढायची आणि जनतेला नको त्या विषयात स्वारस्य घ्यायला भाग पाडण्याचा उद्योग आता कंटाळवाणा होत आहे. यामुळे जनता तर दुर्लक्ष करेल. पण, आशेवर बसलेले त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक मात्र आपण चुकीच्या दिशेने प्रवास करीत आहोत या मनस्थितीत जात असल्याने, या मळमळत असल्याचा सोक्षमोक्ष लावण्याची जबाबदारी आता त्यांच्याच कार्यकर्त्यांवर येऊन पडली आहे.
 
संजय राऊतांनी बोलायचे आणि कार्यकर्त्यांनी त्याचे समर्थन करायचे, हे आता नाईलाज म्हणून गांभीर्याने घेतले जात आहे. निदान महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असे आणि एक जबाबदार विरोधक म्हणून, या लोकांनी लोकशाहीचा महत्त्वाचा घटक म्हणून तरी वागलेे पाहिजे. अन्यथा त्यांची जशी अस्तित्व संपण्याची सुरुवात झाली आहे, तिचा अंत यायला वेळ लागणार नाही. राज्यात सुदैवाने सुज्ञ मतदारांनी एवढा घाणेरडा राजकीय गदारोळ होऊन देखील, कामे करणार्‍या लोकांना पसंती देत सरकार निवडले आहे. त्यामुळे अशा सरकारसोबत समन्वयाने काम करीत हे विरोधक सक्रिय झाले, तरच काही यांचे खरे आहे. राजकारणात त्यांनी किमान नैतिकतेने एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून तरी वागले पाहिजे. अन्यथा या सततच्या मळमळीत त्यांची घाण झालेली बघायला मिळेल,एवढे नक्की.
 
 
 
अतुल तांदळीकर  
 
Powered By Sangraha 9.0