मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भेटीमागचं कारण आलं समोर

22 Feb 2025 13:14:06

Uday Samant Meet Raj Thackeray
 
मुंबई : (Uday Samant Meet Raj Thackeray)  राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी शनिवारी दि. २२ फेब्रुवारीला सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, याविषय़ी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे.
 
राज ठाकरेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा नाही
 
“पुण्यात विश्व मराठी संमेलन झाले होते. त्यावेळी संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंना उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिले होते. त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर त्यांची माझी भेट झाली नव्हती. त्यांचे आभार मानण्यासाठी आज मी इथे आलो होतो. आमच्यात मराठी भाषेसंदर्भात चर्चा झाली. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. त्याबद्दल गप्पा मारल्या. राज ठाकरेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीला कोणी राजकीय स्पर्श करु नये. ही अतिशय साधी आणि सहज भेट होती, राजकीय भेट नव्हती.” असं उदय सामंत म्हणाले.
 
“राज ठाकरे असं व्यक्तीमत्व आहे, राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या की आपल्या ज्ञानात भर पडते. या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. त्यांच्यासमवेत चर्चा केल्यावर अजून काही गोष्टी कळतात. तर गप्पानुरुप चर्चा, मराठी भाषेसह उद्योजकांवर कुठलाही अन्याय होऊ नये, यासाठी मी मंत्री म्हणून पुढाकार घेण्यासंदर्भात राज ठाकरेंकडून मार्गदर्शन घेतले, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0