मुंबई : वादग्रस्त कार्यक्रम ‘इंडियाज गॉट लेटेंट’ प्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे. २७ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यासाठी तिला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या कारवाईनंतर राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “मला समन्स बजावण्यात काहीही अर्थ नाही. व्हिडीओ कॉलद्वारे तुम्ही विचारणा करू शकता, मी उत्तर द्यायला तयार आहे. कलाकार म्हणून मला कार्यक्रमासाठी पैसे देऊन बोलावण्यात आले होते. मी कोणालाही शिवीगाळ केली नाही, त्यामुळे माझ्यावर कारवाईचा काहीही आधार नाही.”
तिने पुढे म्हटले, “देशात अनेक गंभीर प्रकरणे आहेत, विशेषतः बलात्कारासारखी गुन्हेगारी वाढत आहे. अशा प्रकरणांकडे लक्ष द्या आणि आरोपींना शिक्षा द्या. मी दुबईत आहे, माझ्याकडे कोणतेही काम नाही, पैसा नाही. मला बोलावून काय होणार?”
राखी सावंतच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तिच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण तिच्या भूमिकेचे समर्थन करत असताना, काहींनी तिच्या विधानांवर टीका केली आहे. आता ती सायबर सेलसमोर हजर राहते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..