मुंबई: विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाक्यात कमाई करत सातव्या दिवशीच ३१०.५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मराठा साम्राज्यातील पराक्रमी योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
भारतामध्ये ‘छावा’ने पहिल्याच आठवड्यात २२५.२८ कोटींची घसघशीत कमाई केली असून, २०२५ मध्ये आतापर्यंत ३०० कोटी पार करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘छावा’ चित्रपटाला करमुक्त घोषित केले असून, मध्य प्रदेश सरकारनेही त्याला करमुक्त दर्जा दिला आहे. हा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जाहीर करण्यात आला.
चित्रपटाच्या यशाने भारावलेल्या विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांचे आभार मानले. त्याने म्हटले, "तुमच्या सर्व मेसेजेस, कॉल्स, आणि चित्रपट पाहिल्यानंतर शेअर केलेल्या व्हिडिओज... हे सगळं मी पाहतोय, अनुभवतोय. तुम्ही दाखवलेल्या प्रेमासाठी मनःपूर्वक आभार! छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा उत्सव तुम्ही साजरा करता आहात, हे पाहून मी कृतज्ञ आहे."
शिवाजी सावंत यांच्या प्रसिद्ध ‘छावा’ कादंबरीवर आधारित या चित्रपटात रश्मिका मंदान्ना (येसूबाई भोसले), अक्षय खन्ना (औरंगजेब), डायना पेंटी (जिनत-उन-निस्सा बेगम), दिव्या दत्ता (सोयराबाई), विनीत कुमार सिंग (कवी कलश) आणि आशुतोष राणा (हंबीरराव मोहिते) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.