मेट्रो २ब संरचनांची उंची वाढवणे शक्य नाही : एमएमआरडीए

22 Feb 2025 11:16:12

kurla
मुंबई, दि.२२: प्रतिनिधी मुंबई मेट्रो २ ब डीएन नगर ते मंडाले या मार्गाच्या कुर्ला पश्चिम येथील हलाव पुलावरून जाणाऱ्या मेट्रो मार्गिकेवरून स्थानिक आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात संघर्ष सुरु आहे. इतकेच नाहीतर याभागातून जाणाऱ्या मेट्रो पुलाच्या उंचीवरून कुर्ला पश्चिममधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही आक्षेप नोंदवत या मेट्रो मार्गिकेची उंची वाढवावी अशी मागणी केली होती. मात्र, मेट्रो संरचना भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) मंजूर केलेल्या उंचीच्या मर्यादांनुसार काटेकोरपणे बांधल्या गेल्या आहेत. परिणामी, मेट्रो संरचनांची उंची वाढवणे शक्य नाही, असे प्रकल्पाच्या पाहणी अंती एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी एमएमआरडीए, बीएमसी आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घटनास्थळाला भेट दिली. या पाहणीत एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता श्रीकांत जाधव, पालिकेचे कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, उप प्रमुख अग्निशमन अधिकारी संदेश राणे, विभागीय अधिकारी प्रीतम सावंत तसेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, उमेश गायकवाड, अनिल मांडवकर, प्रकाश चौधरी आणि अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. बैठकीदरम्यान, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पुनरुच्चार केला की, मेट्रो संरचना भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) मंजूर केलेल्या उंचीच्या मर्यादांनुसार काटेकोरपणे बांधल्या गेल्या आहेत. परिणामी, मेट्रो संरचनांची उंची वाढवणे शक्य नाही. मुंबईच्या मेट्रो नेटवर्कची सुरक्षितता आणि सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी अंमलात आणण्यासाठी आणि नियामक आवश्यकतांचे पालन करण्यासाठी एमएमआरडीए वचनबद्ध आहे.
एमएमआरडीएने पाहणीनंतर सांगितले की, एमएमआरडीए गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (एमओएचयूए) निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून मेट्रो प्रकल्प राबवत आहे. सर्व मेट्रो स्टेशन इमारतींची सीएमआरएसकडून कठोर तपासणी केली जाते. यानंतरच विहित सुरक्षा आवश्यकता आणि वैशिष्ट्यांनुसार अग्निशमन एनओसी मिळवली जाते. कुर्ला-पश्चिम परिसरात, मेट्रो अलाइनमेंट दुसऱ्या स्तरावर एससीएलआरवर हलाव ब्रिज ओलांडते. हा पूल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) फनेल झोनमध्ये येत असल्याने, विमान वाहतूक सुरक्षा नियमांनुसार इमारतींची उंची मर्यादित आहे. परिणामी, मेट्रो व्हायाडक्टच्या खाली हलाव ब्रिजवर उपलब्ध असलेली मंजुरी 3.5 मीटर आहे. अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन तयारी सुनिश्चित करण्यासाठी, अग्निशमन दलासाठी पर्यायी मार्ग निवडण्यात आले आहेत आणि त्यांचे मूल्यांकन केले गेले आहे.परिणामी, मेट्रो संरचनांची उंची वाढवणे शक्य नाही, असे प्रकल्पाच्या पाहणी अंती एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.
स्थानकांची मागणी काय ?
स्थानीय नागरिकांची प्रमुख मागणी अशी आहे की मेट्रो मार्गाची उंची ५ मीटरने वाढवावी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. बाजूचा रस्ता विकसित करावा, गणेशोत्सव व नवरात्रीसारख्या सार्वजनिक सणांसाठी सोयीस्कर व्यवस्था निर्माण करावी. पालिकेने सर्व्हे करून प्रस्तावित विकास कामे एमएमआरडीएला सुचवावीत, जेणेकरून वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन त्वरित अंमलबजावणी करता येईल.
Powered By Sangraha 9.0