मुंबई : चाळीस वर्षांहून अधिक काळ चेंबूर येथील श्री हॉस्पिटलमध्ये अविरत उत्कृष्ट रुग्णसेवा देणाऱ्या सुप्रसिद्ध अस्थिशल्यचिकित्सिक डॉ.विनोद करकरे यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एका संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबूरच्या फाईन आर्ट सोसायटी येथे दि. रविवार, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ वा. या वेळेत ही मैफील आयोजित करण्यात आली आहे. गेली ४० वर्षांहून डॉ.करकरे रुग्णसेवा देत आहेत. करकरे यांचे शिक्षण एम.एस.जनरल आणि एम.एस. ऑर्थोपेडीकमध्ये पूर्ण केले. त्यांनी वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयात अनेक वर्षे सेवा दिली.
या दरम्यान, १९७९ दरम्यान हिमालयात गिर्यारोहणासाठी जाणाऱ्यांपैकी बरेच जण हिमदंशाने बाधित होते. अशा रुग्णांना उच्चदाबाच्या ऑक्सिजन चेंबरमध्ये ठेवून त्यांच्यावर डॉ.करकरे त्यांनी केलेल्या यशस्वी उपचाराचा दाखला आजही दिला जातो. त्यानंतर चेंबूरमध्ये त्यांनी ‘श्री हॉस्पिटल’ सुरू केले. समाजकार्यात हातभार लागावा म्हणून साताऱ्यातील श्रीगोंदवलेकर महाराजांच्या मठातही त्यांनी काहीकाळ मोफत रुग्णसेवा केली. वयाच्या ८० व्या वर्षानंतरही त्यांची रुग्णसेवा आजही अविरत सुरू आहे. त्यांना वाद्यवृंद वादनासह गीतगायनाचीही आवड आहे.