सध्याच्या काळावर एआयचे गारुड आहे. सर्वत्र एआयची चर्चा सर्वांच्याच कानावर पडते. एआयचा विस्तार व्यापक असून, सर्वसामान्य माणसांना एआय फक्त चॅट जीपीटीपुरतेच माहित असते. मात्र, या तंत्रज्ञानाला असणारा इतिहास फार मोठा आहे. त्याच इतिहासाचा घेतलेला हा आढावा...
रविवार उजाडला, आज जयंतराव आणि त्यांचे मित्र आदित्यबरोबर हॉटेलमध्ये जमणार होते. चल बाबा, चालू कर तुझे ते ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ पुराण. माधवा, आज माझा नातू आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘चॅट जीपीटी’बद्दल सांगणार आहे. माधव म्हणजे जयंतरावांचा मित्र, एका कॉलेजमधून निवृत्त झालेला. आजोबा एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगितली पाहिजे की, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे केवळ ‘चॅट जीपीटी’ नव्हे. ‘चॅट जीपीटी’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे केवळ एक उदाहरण आहे. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास हा तसा जुना आहे. म्हणजे अगदी तुमच्या सगळ्यांच्याच जन्माच्या वेळचा. आज आपण प्रथम, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतिहासाबद्दल बोलू.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे काल आजचे काहीतरी प्रकरण आहे, असे समजणारे जयंतराव आणि त्यांचे मित्र कान टवकारून ऐकू लागले. ‘डार्टमाऊथ कॉलेज’ हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध आयवी लीग कॉलेज. जॉन मॅकार्थी या कॉलेजमधला गणिताचा एक तरुण प्राध्यापक. त्याकाळी ‘विचार करणारी यंत्र किंवा थिंकिंग मशीन्स’ याबद्दल खूप चर्चा चालू होती. ही केवळ काल्पनिक यंत्रांबद्दल चर्चा होती परंतु, प्रत्यक्षात असे काहीच अस्तित्वात नव्हते. पण, जॉन मॅकार्थीने अशा यंत्रांबद्दल चर्चा करण्यासाठी, एका संशोधन प्रकल्पाचा एक प्रस्ताव मांडला. जवळपास 20 गणिततज्ज्ञ सहा ते आठ आठवडे डार्टमाऊथमध्ये पूर्णवेळ राहून, त्यांनी विचार करणार्या यंत्रांबद्दल संशोधन केले. या प्रकल्पातून जी काही चर्चा झाली, त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया घातला गेला. जॉन मॅकार्थीला ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या संज्ञेचा आणि या क्षेत्राचा प्रवर्तक मानले जाते.
बघ माधवा, अमेरिकेत प्राध्यापक लोक अशी मोठी कामे पण करतात. जयंतरावांनी आपल्या प्राध्यापक मित्राचा पाय खेचायची संधी सोडली नाही.
1960 सालच्या दशकात, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य दिले. स्टॅनफर्डसारख्या विद्यापीठांना मोठ्या प्रमाणात निधी दिला. यातूनच त्याच सुमारास, नव्याने तयार होत असलेल्या संगणकावर माणसासारखे विचार करू शकतील, असे काही प्रोग्रॅम तयार केले गेले. भूमितीतील किंवा बीजगणितातील गणिते सोडवणे, सोपी इंग्रजी वाक्य तयार करणे, असे प्रोग्रॅम लिहिले गेले. आज आपण विचार केला, तर संगणकासाठी ही कामे एकदमच सोपी आहेत. पण, या प्रोग्रॅम बरोबर विकसित झालेल्या गणिती सिद्धांतांमुळे, आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया घातला गेला.
1960 सालच्या दशकात या क्षेत्रातील शास्त्रज्ञांना, जग जिंकल्याचा आनंद झाला होता. काही क्लिष्ट गणिते सोडवणे, बुद्धिबळ खेळणे अशी अवघड काम करणारे प्रोग्रॅम त्यांनी तयार केले होते. पण, त्यानंतरच खरी आव्हाने त्यांच्या सामोरी आली. त्यांनी एखादे चित्र किंवा चेहरा ओळखणे किंवा रोजच्या व्यवहारातली वाक्य तयार करणे यावर काम चालू केले. पण, यासाठी एखाद्या लहान मुलाला जेवढे ज्ञान असते, तेवढे ज्ञान संगणकाला करून देणे आवश्यक होते. पण, हे खूप काम मोठे आणि कष्टाचे होते. तुम्हीच विचार करा, एखादे गणित सोडवण्यासाठी संगणकाला काही ठराविक आज्ञा द्याव्या लागतात पण, माणसांचे चेहरे ओळखण्यासाठी किती जास्त प्रमाणात गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याकाळचे संगणक अगदी कमी शक्तिशाली होते. आजच्या संगणकाच्या प्रमाणात तर ते संगणक म्हणजे, छोटी खेळणीच होती, ज्याच्यावर जास्त माहिती साठवणे किंवा गुंतागुंतीचे प्रोग्रॅम लिहिणेही शक्य नव्हते. काही शास्त्रज्ञांनी तर जगातले सगळे प्रश्न हे संगणक सोडवू शकेल, अशी हवा करून ठेवली होती. त्यामुळे हळूहळू अमेरिकन सरकारने निधी कमी करायला सुरुवात केली. 1970 ते 1980 हे दशक म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी अवघड काळ होता.
1980 सालच्या सुमारास जपान सरकारने, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यायला सुरुवात केली. इंग्लंड सरकारने पण निधी दिला आणि मग अमेरिकन सरकारने, परत पैसे गुंतवायला सुरुवात केली. या काळात मोठ्या प्रमाणात एक्स्पर्ट सिस्टीम किंवा तज्ज्ञ प्रणाली तयार करण्यास सुरुवात झाली. सोप्या भाषेत सांगायचे, तर एखादा प्रश्न सोडवण्यासाठी नियम बनवायचे. हे नियम त्या प्रश्नासाठी एकदम उपयुक्त असतील. पण, त्या क्षेत्रातील इतर प्रश्न सोडवण्यासाठी, कदाचित उपयुक्त नसतील. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला कर्ज द्यायचे की नाही, याचे नियम, ’कर्ज घेण्यासाठीचे नियम’ या प्रोग्रॅममध्ये लिहिले. त्यामुळे संगणक माणसाप्रमाणे कर्जाबाबत निर्णय घेऊ लागला. पण, बँकेची इतर कामे तोच कम्प्युटर प्रोग्रॅम नाही करू शकला, त्यासाठी दुसरा प्रोग्रॅम आवश्यक ठरला.
1990 सालच्या दशकात, परत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी अवघड काळ आला. गुंतवणूक कमी झाली. पूर्वी तयार केलेल्या एक्स्पर्ट सिस्टीम महाग ठरू लागल्या. याच सुमारास स्वस्तात उपलब्ध असलेल्या, खासगी संगणकचा उगम झाला आणि एक्स्पर्ट सिस्टीमसाठी मोठ्या मोठ्या संगणकामध्ये गुंतवणूक करणे, खर्चिक वाटू लागले. एकूणच काय तर 1990 सालच्या दशकात कृत्रिम बुद्धिमत्ताबद्दल व्यापार जगताची आणि विविध सरकारी विभागांची, परत एकदा निराशा होऊ लागली. आदित्यने आपले विवेचन संपवले आणि त्याच्या आवडीचे, आजोबांनी मागवलेले इडली सांबर खायला सुरुवात केली.
पण, मग या सगळ्या चढ उतारात मोठे बदल कधी झाले? आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल जगभर जो उत्साह पाहतो, तो कधी सुरू झाला? जयंतरावांनी विचारले. गेल्या काही दशकात संगणकतज्ज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे तयार होणार्या संगणकची मेमरी, माहिती साठवण्याची क्षमता आणि प्रक्रिया करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढत होती. 2005 सालच्या सुमारास ‘बिग डेटा’ नावाची एक क्रांती, संगणक जगतात सुरू झाली. त्याच्यामुळे अनेक संगणकांचे एक जाळे तयार करून, प्रचंड मोठा माहितीचा साठा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे सुकर झाले. हा डेटा काही पेटाबाईट एवढा पण मोठा असू शकत होता. अशा मोठ्या क्षमतेमुळे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीला वेग आला. मोठ्या प्रमाणात माहिती जमा करून आणि त्यावर डीप लर्निंगसारखे तंत्र वापरून, कृत्रिम बुद्धिमत्तेमधील संशोधनाला वेग आला.
पण, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे, ‘जनरेटिव्ह एआय’चा उदय. हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे जे मजकूर, फोटो किंवा चित्र, संगीत आणि व्हिडिओ नवीन स्वरूपात तयार करू शकते. 2020 सालच्या सुमारास ‘ओपन एआय’, ‘डीप माईंड’ वगैरे कंपन्यांमध्ये, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू झाली. 2014 साली 1 हजार, 800 कोटी डॉलर्स असणारी ‘एआय’मधील गुंतवणूक 2021 साली 12 हजार कोटी झाली. ‘जनरेटिव्ह एआय’मध्ये नावीन्यपूर्ण संशोधन होत आहे. जगभरातील व्यवसाय त्याचा प्रयोग करत आहेत. नवीन उद्योजक आणि गुंतवणूकदार, ‘एआय’वर आधारित व्यवसायिक कल्पना लॉन्च करीत आहेत. ‘जनरेटिव्ह एआय’ने तंत्रज्ञानात एक नवीन युग सुरू केले आहे. एलॉन मस्क, सॅम आल्ट्मन ही ‘जनरेटिव्ह एआय’च्या क्षेत्रामधील काही प्रमुख नावे! आजोबा तुम्ही ज्याचे नाव सारखे ऐकता, ते ‘चॅट जीपीटी’ हे ‘जनरेटिव्ह एआय’ वापरणारे एक तंत्रज्ञान आहे. या क्षेत्रात घडामोडी इतक्या प्रचंड वेगाने चालू आहेत की, कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र अक्षरशः रोज बदलत आहे. आदित्यने दीर्घ श्वास घेतला आणि तो आजोबांकडे आणि त्यांच्या मित्रांकडे पाहू लागला. या क्षेत्राचा प्रचंड आवाका, जुना इतिहास ऐकून सगळे भारावून गेले होते.
हे सगळे वर्णन ऐकून, माधवमधला प्राध्यापक जागा झाला आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. खूप छान समजावून सांगितलास ‘एआय’चा इतिहास आदित्य. आता आम्हाला हे तर नीट कळले की, ‘एआय’ म्हणजे केवळ ‘चॅट जीपीटी’ नाही. ‘एआय’ला मोठा इतिहास आहे. ‘एआय’ला जवळजवळ 70 वर्षांचा इतिहास आहे. पण, गेल्या 70 वर्षांत ‘एआय’ने कोणकोणते प्रश्न सोडवले आहेत, ते सांगतोस का?
नक्कीच आजोबा. पण, हे सगळे ऐकायला तुम्हाला मला परत एकदा पार्टी द्यावी लागेल. आपण पुढच्या रविवारी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पाहू आणि गेल्या 70 वर्षात ‘एआय’ने कोणकोणते प्रश्न सोडवले आहेत, त्याची चर्चा करू.
डॉ. कुलदीप देशपांडे