नागपूर : (GBS Death) राज्यात 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' म्हणजेच जीबीएसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक आहे. एकीकडे पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढत असतानाच आता राज्यातील विविध भागांमध्येही या आजाराचा प्रभाव पाहायला मिळत आहे. नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढत असून आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. नागपूरातील जीबीएसचा हा तिसरा बळी असून राज्यातील मृतांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. नागपूरातील एका मोठ्या खासगी रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी अत्यंत गंभीर स्थितीत या रुग्णाला जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला आणखीही इतर आजार होते. सध्या नागपूरच्या जीएमसी रुग्णालयात एक लहान मूल आणि दोन प्रौढ रुग्ण उपचार घेत आहेत.