धनंजय मुंडेंना झालेला बेल्स पाल्सी आजार नेमका काय? त्याची लक्षणं कोणती? जाणून घ्या...

21 Feb 2025 17:32:20

bell’s palsy disease symptoms and causes
 
 
Bell’s Palsy Disease : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला आहे. त्यांनी दि. २० फेब्रुवारी रोजी एक्सवर या आजारासंबंधित एक पोस्ट करत माहिती दिली आहे. या आजारामुळे त्यांना दोन मिनिटंही नीट बोलता येत नाही, ज्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सहभागी होता येत नाही, अशी माहिती त्यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. बेल्स पाल्सी हा एक दुर्मीळ असा आजार आहे, ज्यात चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. यात अनेकदा चेहऱ्याच्या एका बाजूवर परिणाम होतो, त्यामुळे दैनंदिन कामे करताना अडचणी जाणवू शकतात. पण, हा आजार नेमका काय आहे? कशामुळे होतो? त्याची लक्षणं आणि उपाय काय जाणून घेऊ…
 
बेल्स पाल्सी म्हणजे काय?
 
बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानक येणारा कमकुवतपणा, यात अनेकदा चेहऱ्याच्या एका बाजूला परिणाम होतो. स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या चेहऱ्याच्या नसांमध्ये जळजळ झाल्याने असे होते, यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते. खऱंतर बेल्स पाल्सी ही एक तात्पुरती मेडीकल कंडीशन आहे ज्यामध्ये आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये अस्थायी कमकुवतपणा किंवा अंशत: पक्षाघात होतो. यामुळे चेहरा लटकणे, डोळ्यांची उघडझाप करण्यास तसेच बोलण्यास अडथळा निर्माण होतो. थोडक्यात चेहऱ्याच्या हालचाली करण्यात अडचणी येऊ शकतात.
 
बेल्स पाल्सी आजार कशामुळे होतो? 
 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड स्ट्रोक नुसार, अमेरिकेत दरवर्षी ४० हजार लोक बेल्स पाल्सी आजाराने ग्रस्त होतात. पण, हा आजार होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, विषाणूजन्य संसर्ग, कमकुवत प्रतिकारशक्ती, मज्जासंस्थेच्या समस्यांपासून ते अनुवांशिकतेपर्यंत कोणत्याही कारणांमुळे हा आजार उद्भवू शकतो असे सांगितले जाते. दरम्यान, याचा मधुमेही आणि दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवतो.
 
आजाराची लक्षणे काय आहेत?
 
१) चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवणे.
२) चेहऱ्याच्या हालचाली करताना चेहरा सुजल्याचे दिसणे.
३) डोळे उघडझाप करताना अडथळा निर्माण होणे.
४) डोळे कोरडे पडणे.
५) चवीत बदल जाणवणे.
६) एका कानात विशिष्ट आवाजांबद्दल संवेदनशीलता वाढते. अशाने व्यक्तीच्या श्रवणक्षमतेवर परिणाम होतो.
 
उपचार काय?
 
१) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे घेणे
२) चेहऱ्याचे स्नायू बळकट करण्यासाठी रुग्णास फिजिकल थेरपी करण्याचा सल्ला दिला जातो.
३) डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आय ड्रॉप्स वापरणे.
 
बेल्स पाल्सी आजार प्राणघातक नाही, योग्य उपचार घेतल्यानंतर बहुतेक लोक यातून पूर्णपणे बरे होऊ शकतात. या आजारातून बरे होण्यासाठी सहसा एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. काही प्रकरणांमध्ये अधिक वेळ लागू शकतो, तर काहींना दीर्घकालीन समस्यांचादेखील सामना करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे या आजारावरील योग्य उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0