सध्या लग्नसराईचा मौसम सुरु झालेला दिसतो. अनेक कुटुंबे त्यांच्या आयुष्यभराची स्वकष्टाची कमाई या लग्नसोहळ्यासाठी खर्ची घालतात. पण, दुर्दैवाने कोणत्याही कारणास्तव या लग्नसोहळ्यावर विघ्नाचे सावट आले तर, यासाठी केलेला संपूर्ण खर्च मातीमोलही ठरु शकतो. म्हणूनच आता विवाहविम्याची संकल्पना हळूहळू प्रचलित होताना दिसते. त्यानिमित्ताने नेमकी ही संकल्पना आणि या प्रकारच्या विमा पॉलिसीतील तरतुदी यांचा आढावा घेणारा हा लेख...
अलीकडच्या काळात विवाह हा एक मोठा ‘इव्हेंट’ झाला आहे. बर्याच ठिकाणी तर चार-चार, पाच-पाच दिवस सध्या विवाह सोहळा रंगलेला दिसतो. एक दिवस संगीत, एक दिवस मेहंदी वगैरे वगैरे. तसेच, सध्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीना विवाह सोहळा आयोजित करून देण्याचे काम सांगण्यात येते. तसेच शहरांमध्ये तर ‘डेस्टिनेशन वेडिंग’चेही खुळ पसरले आहे. पूर्वीच्या काळी काही हजारांत होणार्या विवाह सोहळ्यांवर आता कोटींच्या कोटी रुपये खर्च केले जातात. आता एवढा पैसा खर्च होणार म्हटल्यावर लोक विमा संरक्षणाचा विचार करणारच. परिणामी, आता विवाह समारंभासाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. विवाह समारंभांमध्ये दुर्दैवाने काही विघ्न आल्याने आर्थिक नुकसान झाले, तर त्याची भरपाई होण्यासाठी विवाह समारंभाचा विमा ही संकल्पना अस्तित्वात आली.
सध्या विवाह सोहळ्यासाठी राजेशाही महाल, निसर्गरम्य ठिकाणी असणारे एखादे सुंदर रिसॉर्ट, पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेल, मोठी कार्यालये अशी ठिकाणे निवडली जातात. समजा, या ठिकाणाला आग लागली, तर अशा वेळी विमा संरक्षण असेल, तरच नुकसान भरपाई मिळू शकेल. काही कारणांमुळे विवाह पुढे ढकलावा लागला, रद्द झाला, तरीही प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. यामुळे विमा कंपन्यांनी ‘वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी’ काढल्या आहेत. सध्या ही पॉलिसी उतरविणार्यांचे प्रमाण फार कमी आहे. बर्याच जणांना या पॉलिसी माहितीही नाहीत.
कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी संभाव्य जोखीम विचारात घेऊन घेतली जाते. या पॉलिसीत अंतर्भूत असलेल्या संभाव्य जोखीम- १) नवरा किंवा नवरी यांना लग्न समारंभाच्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे उपस्थित राहणे शक्य न होणे. यात रेल्वेत बिघाड, रस्त्यावरील वाहतुककोंडी किंवा वाहनास अपघात. कायदा व सुव्यवस्था बिघडणे (जे हल्ली वारंवार होत असते.) भूकंप, चक्रीवादळ, अतिवृष्टी, ढगफुटी अशांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा समावेश. २) नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी किंवा दोघेही अपघात किंवा अन्य कारणाने जखमी झाल्याने किंवा गंभीर आजारी झाल्याने विवाह समारंभास उपस्थित न राहू शकणे. ३) नवरा मुलाच्या किंवा नवरीच्या जवळच्या नातेवाईकाचा आकस्मित मृत्यू होणे. पण, जवळचे नातेवाईक कोण? याचा उल्लेख पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये असणे आवश्यक आहे. ४) लग्नसमारंभाच्या ठिकाणी आग लागणे, दंगल, अन्नविषबाधा यामुळे होणारे नुकसान. ५) पॉलिसीधारकाचे दागिने, लग्नाचे पोषाख, भेटवस्तू इत्यादींची चोरी यांसारख्या कारणाने विवाह समारंभ रद्द झाल्यास अथवा पुढे ढकलला गेल्यास झालेल्या खर्चाची नुकसान भरपाई पॉलिसी कव्हरच्या किंवा झालेल्या नुकसानीची रक्कम, या दोन्हीत कमी असणार्या रकमेइतकी दिली जाते.
नुकसान भरपाई मिळणारे खर्च- (अ) निमंत्रण पत्रिकांसाठी झालेला खर्च (ब) कार्यालय अथवा ज्या हॉटेल किंवा डेस्टिनेशन विवाह होणार होता, त्यासाठी दिलेली आगाऊ रक्कम (क) कॅटरिंगसाठी दिलेली आगाऊ रक्कम (ड) डेकोरेशन, वाद्यवृंद, फोटोग्राफर, मेकअप यासाठी आगाऊ दिलेली रक्कम (इ) हॉटेल व प्रवासासाठीच्या बुकिंगवर झालेल्या खर्चाची रक्कम (ई) समारंभासाठी वापरल्या जाणार्या वस्तूंची (ज्यानंतर वापरता येत नाहीत व परतही करता येत नाहीत अशा वस्तू) किंमत. पॉलिसीचा दावा संमत न होण्याची कारणे - १) वर अथवा वधू यातील एक जण विवाह समारंभास उपस्थित न राहता पळून गेल्यास अथवा लपून बसल्यास २) वधू व वर पक्षात मतभेद होऊन विवाह रद्द झाल्यास ३) विवाह समारंभ जबरदस्तीने झाल्यास ४) मद्य अथवा अमली पदार्थ सेवन करून विवाह झाल्यास ५) समारंभप्रसंगी गुन्हेगारी कृत्य घडल्यास ६) हलगर्जीपणामुळे नुकसान झाल्यास ७) ऐनवेळी विवाहस्थळ उपलब्ध न झाल्यास ८) जन्मत: असलेल्या आजारामुळे पॉलिसीत समाविष्ट असणारी व्यक्ती त्या कारणाने व्यक्ती आजारी पडल्यास.
विमा समारंभ विमा पॉलिसीचा कालावधी साधारणपणे सात दिवसांचा असतो. विवाह झाल्याच्या दुसर्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ही पॉलिसी कार्यरत राहते. पॉलिसी कालावधी विमा कंपनीनुसार कमी-जास्त असतो. पॉलिसी कव्हरमध्ये लग्नाच्या एकूण खर्चाचा तपशील द्यावा लागतो. भाड्याने घेतलेल्या वस्तू व मालमत्ता यांचाही तपशील द्यावा लागतो व यानुसार ‘प्रीमियम’ची रक्कम ठरते.
या पॉलिसीत विवाहांच्या अनुषंगाने होणार्या समारंभांचाही समावेश करून घेता येतो. हे ‘कव्हर’ हवे असेल, तर हे विधी लग्नाच्या तारखेच्या सात दिवसांच्या आत व्हावयास हवेत. हे समारंभ म्हणजे मेहंदी, संगीत, हळद, सीमांतपूजन इत्यादी इत्यादी. खासगी विमा कंपन्या दोन लाख रुपये मूल्याच्या विम्यासाठी रुपये चार हजार, तर आठ लाख रुपयांच्या विम्यासाठी सुमारे १५ हजार रुपये एवढा प्रिमियम आकारतात.
क्लेम (दावा) प्रक्रिया - एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर संबंधित कंपनीला प्रत्यक्ष भेटून किंवा लेखी अर्ज देऊन किंवा ई-मेलने त्वरित कळवावे. शक्य तितक्या लवकर क्लेम अर्ज पूर्ण भरून आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडून तो ‘टीपीए’कडे सुपूर्द करावा. क्लेम अर्जासोबत पॉलिसीची प्रत, आगाऊ दिलेल्या रकमांच्या पावत्या झालेल्या नुकसानीचा तपशील, चोरी झाली असल्यास ‘एफआयआर’ची प्रत, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन पेमेंट केले असल्यास संबंधित खर्चाची नोंद असणारे स्टेटमेंट सोबत जोडावे. दावा साधारणपणे ३० दिवसांच्या आत मंजूर होतो.
या विम्याचे फायदे - विवाहाच्या ठरलेल्या तारखेला काही कारणाने समारंभ रद्द किंवा पुढे ढकलावा लागला, तर या विम्यामुळे झालेल्या खर्चाची नुकसान भरपाई मिळू शकते. पुरवठादाराने, कंत्राटदाराने सेवा देणार्याने ठरलेल्या सेवेची पूर्तता केली नाही, तर या पॉलिसीमुळे नकुसान भरपाई मिळू शकते. विवाहाच्या वेळी दागिने, कपडे किंवा अन्य मौल्यवान वस्तू हरविल्यास किंवा त्याचे नुकसान झाल्यास किंवा ऐवज चोरीला गेल्यास या पॉलिसीतून नुकसान भरपाई मिळू शकते. नवविवाहित जोडप्यापैकी एखाद्याला किंवा जवळच्या नातेवाईकाला आरोग्याशी संबंधित काही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि विवाह पुढे ढकलावा किंवा रद्द करावा लागला, तर यासाठीही दावा मिळू शकतो. विवाहसोहळ्यादरम्यान कोणताही अपघात घडल्यास नुकसान भरपाई मिळते. पूर, वादळ, भूकंप, ढगफुटी यांसारख्या घटनांमुळे लग्नात अडथळा निर्माण झाल्यासही नुकसान भरपाई मिळते.
सार्वजनिक उद्योगातील ‘ओरिएंटल इन्शुरन्स’, ‘युनायटेड इन्शुरन्स’, ‘न्यू इंडिया अॅश्युरन्स’ व ‘नॅशनल इन्शुरन्स’ व खासगी उद्योगातील ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’, ‘बजाज अलियान्स’ ही ‘वेडिंग बेल’ इन्शुरन्स पॉलिसी विकतात. काही कंपन्या ‘इव्हेंट इन्शुरन्स’ पॉलिसीत ‘वेडिंग इव्हेंट’चा समावेश करतात. त्यामुळे त्या कंपन्या ‘वेडिंग बेल इन्शुरन्स’ अशी वेगळी पॉलिसी न देता ‘इव्हेंट इन्शुरन्स’ पॉलिसीतच ‘वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी’ समाविष्ट करतात. हल्ली सर्वसाधारण लग्नांमध्येही २५ ते ३० लाख रुपये देशात असलेल्या प्रचंड महागाईमुळे खर्च येतो. त्यामुळे ही पॉलिसी घेणे योग्य ठरु शकते. फक्त अशा कुठल्याही पॉलिसी घेताना, त्यातील अटी-शर्ती, दावा संमत करण्याची प्रक्रिया वगैरे काळजीपूर्वक समजून घ्यावी आणि मगच निर्णय घ्यावा.