भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी घेतली पोलीस मुख्यालयात एसआयटी पथकाची भेट

20 Feb 2025 19:46:47

Pravin Darekar met the SIT team
मुंबई : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले गेले होते, असा आरोप भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारकडून कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्यात आली होती. आज या एसआयटी पथकाची भाजपा आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई पोलीस मुख्यालयात भेट घेतली आणि आपल्याकडे असलेले सर्व पुरावे सादर केले.
एसआयटी पथकाच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, आज मला या एसआयटीसमोर तपशीलवार माहिती देण्यासाठी बोलावले होते. मी उपलब्ध माहितीच्या, वृत्तवाहिन्यांना आलेल्या बातम्यांच्या आणि माझ्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे जेवढी माहिती होती ती समितीसमोर मांडली. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये, सत्ता कुणाचीही असो, अशा प्रकारे नेत्यांना सत्तेचा दुरुपयोग करून अडकविणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. संविधान, लोकशाहीचे रक्षण, आदर करणारे आम्ही असल्याने सनदशीर मार्गाने या विषयात न्याय मागितलाय. गृहविभागाने गांभीर्याने याची दखल घेतली असून नगर पोलीस स्टेशन, ठाणे आयुक्तालय येथे ७४२/२२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल चौकशी करिता जी एसआयटी स्थापन झालीय त्या एसआयटीला सरकारला अहवाल द्यायचा आहे. त्यामुळे सहकार्य करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात गेलो होतो.
दरम्यान, प्रविण दरेकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. या पेन ड्राईव्हमध्ये सदर षडयंत्राचे स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा त्यांनी केला होता. पेन ड्राईव्ह सादर केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. सभागृहात कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारतर्फे उत्तर देताना एसआयटी स्थापन केली जाईल, असे सांगितले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0