‘सेवा सप्ताहा’तील ‘कुटुंब प्रबोधन गतिविधी’ची भूमिका

    02-Feb-2025
Total Views |
Sewa Saptah

पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दि. ११ ते दि. १९ जानेवारी या कालावधीत ‘सेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. समाजाला (कुटुंबांना) रा. स्व. संघाची ओळख व्हावी, संघकार्याची (सेवाकार्यांची) माहिती मिळावी व प्रत्यक्ष संघ/सेवा कार्यातील त्यांचा सहभाग वाढीस लागावा, तसेच सेवा वस्तीतील कुटुंबांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेस पूरक सहकार्य ‘कुटुंब प्रबोधन गतिविधी’तील दोन उपक्रमांमधून मिळून त्यास चालना मिळावी, असा हेतू यामागे होता. तसेच ‘कुटुंब प्रबोधना’च्या वेगवेगळ्या आयामांच्या विस्ताराचाही विचार त्या त्या ठिकाणी तारतम्याने करणे अपेक्षित आहे. त्याविषयी...

‘कुटुंब प्रबोधन गतिविधी’च्या सहकार्याने सेवा वस्त्यांमध्ये ‘कुटुंब मिलने व पालक सभां’चे आयोजन व्हावे, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. सेवा वस्त्यांमध्ये ‘सुसंस्कारित कुटुंबे व जबाबदार पालकत्व’ हे विषय नांदावे, असे या मागील एक प्रमुख उद्दिष्ट आहे.

‘सेवा वस्त्या’ या भारत देशाचे एक छोटे रूप आहे. आपल्या धर्मासह सर्व जाती, संप्रदाय, उपपंथ, व बर्‍यापैकी समान कौटुंबिक, सामाजिक प्रश्नांना सामोरे जाणारे हे जग असते. सण-उत्सव, राष्ट्रीय सण साजरे करणे, तसेच सहज अगदी एकमेकांच्या मदतीला धावणारे हे जग असते. या जगात आर्थिक संपन्नता नसली, तरी ‘माणुसकी व माणूसपण’ हे प्रत्येक घटकात जिवंत असते. दारिद्—य, व्यसनाधीनता, हिंसा या तीन गोष्टी मात्र मूठभर कुटुंबे वगळता सर्वत्र दिसतात. समरसता, सहकार्य या सह वैविध्यपूर्ण संस्कृतींमध्ये दिसणारी एकात्मता हे आपल्या सेवा वस्त्यांचे वैशिष्ट आहे. सुख, दुःखात एकत्र नांदणारी ही कुटुंबे सेवा वस्तीची एक ठळक ओळख असते.

सेवा कार्य करणार्‍या संस्था (छॠज’ी) नेमकेपणाने या तीन गोष्टींचा विचार करीत विकासात्मक, प्रबोधनात्मक, विधायक, रचनात्मक किंवा गरजेप्रमाणे संघर्षात्मक कार्य, सेवा वस्तीत करीत असतात. आरोग्य, रोजगार, शिक्षण, निवारा, सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण, मूलभूत हक्क-अधिकार, विविध विषयानुरूप सेवा इ. विषयांवर सेवा वस्तीतील घटकांना सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवाकार्यात सामाजिक, आर्थिक उतरंडीवरील सर्व कुटुंबांनी (समाजाने) सहभाग वाढविला पाहिजे, यादृष्टीनेही या सप्ताहात नियोजन करण्यात येणार आहे.

सेवा वस्तीतही आदर्शवत कुटुंबे असतातच. आपल्या कुटुंबाचे चांगले व्हावे, सदस्यांची उन्नती व्हावी व पुढे सगळ्यांच्या पदरी समाधानाचे दिवस यावे, याकरिता ती झटताना दिसतात. कष्ट, सचोटी, प्रामाणिकपणा, त्याग काटकसर, कृतज्ञता, समायोजन अशी अनेक दैनंदिन जीवनातील मूल्ये ते रोजच्या जीवन व्यवहारात जगत असतात. या कुटुंबांचे वेगळेपण अगदी ठळकपणे सेवा वस्तीत दिसते.

प्रत्येकजण आपापल्या परिने कुटुंबातील कामात व कुटुंबाच्या प्रगतीत सहभाग नोंदवित असतो. शासकीय योजना, सेवा कार्यांमधून मिळणारी मदत तसेच स्वकष्टातून अशा घरातील मुले उच्चशिक्षित व उच्च पदस्थ नोकर्‍यांकरिता प्रामाणिक कष्ट करीत असतात. याचीच काही उदाहरणे म्हणजे कदम रिक्शावाले काकांचा लेक कलेक्टर होतो व मोलाचे काम करणार्‍या सकपाळ वहिनींचा मुलगा इंजिनियर होऊन अमेरिकेतील एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरीला लागतो. अशा कुटुंबांमध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, धार्मिक आचरण, एकूणच भारतीयत्व पदोपदी आचरणातून दिसते. अशा कुटुंबांची संख्या वाढणे, हा एक प्रमुख हेतू सेवाकार्य सप्ताहाच्या आयोजनामागे आहे हे नक्की.

प्रत्येक मुलाची पहिली शाळा हे त्याचे कुटुंब असते. याच शाळेत हे मुलं धर्म, संस्कृती, संस्कार, नाती, कृतज्ञता, समायोजन व अगदी भावभावनांचे व्यवस्थापन शिकत असते. या कुटुंबांना संघटित करून (तीन-पाच कुटुंबांचा समूह करून), अधिक सशक्त, सक्षम क्रियाशील व अधिक जबाबदार नागरिकांची निर्मिती करण्याकरिता ‘कुटुंब मिलने’ घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम नेमकेपणाने सर्वांच्या मानसिकतेवर थेट परिणाम करतो. मुख्य म्हणजे, आपला धर्म, हिंदू जीवनशैली व हिंदुत्ववादी दैनंदिन जीवनातील मूल्ये या उपक्रमातून विविध कुटुंबे सहजपणे आत्मसात करू लागतात, असा अनेक प्रयोगांमधून निष्कर्ष प्राप्त झाला आहे. सेवा वस्त्यांमध्ये कुटुंब मिलने सुरू करणे व ती कार्यान्वित ठेवणे, हे या सेवा सप्ताहाचे फलित ठरले पाहिजे. यादृष्टीनेदेखील नियोजन करण्यात येत आहे.

‘कुटुंब प्रबोधन गतिविधी’मार्फत यानिमित्ताने सेवा वस्तीत पालकसभांचे आयोजनही करण्यात येणार आहे. पालक-पाल्यांतील स्नेह, सकस संवाद, परपस्परांमधील आदर, कुटुंब म्हणून सांधिकता व डोळसपणे पालकत्व निभावण्याच्या दृष्टीने पालकांचे सक्षमीकरण असे फलित यातून अपेक्षित आहे.

राष्ट्रबांधणी, राष्ट्रहित व राष्ट्रकार्य सेवा करण्याकरिता कुटुंबांचे संघटन, सक्षमीकरण व योग्य मानसिकता जडणघडण होणे आवश्यक असते. पूर्वी म्हटल्याप्रमाणे, ‘प्रत्येक मुलाची, कुटुंब ही शाळाच असते’ हे सूत्र लक्षात ठेवत कुटुंबांसह काम करणे, आज चुकीच्या नॅरेटिव्हच्या पुरात, अनिवार्य आहे, हो ना?

स्मिता कुलकर्णी
(लेखिका प. महाराष्ट्र प्रांत, कुटुंब प्रबोधन गतिविधी प्रांत मंडळ सदस्या व अध्ययन संशोधन आयाम प्रमुख आहेत.)