बंगाली भाषेतील पहिली कवयित्री म्हणून चंद्रावतीला मान दिला जातो. वंगभूमीमध्ये मध्ययुगात इ. स. १५५० ते १६०० असा तिचा काळ मानला जातो. चंद्रावती ही बन्सीधर भट्टाचार्य या मनसादेवी उपासकाची कन्या, कवित्वाची नैसर्गिक देणगी लाभलेली. तिने अनेक गीतातून रामसीतेची कथा गायलेली आहे. या गीतसंग्रहालाच ‘चंद्रावतीचे रामायण’ म्हणून ओळखले जाते. हे रामायण नसून खर्या अर्थाने ‘सीतायन’ आहे. हे रामायण सीताप्रधान आहे. ते लिखित नसून मौखिक आहे. ही गीते आधी सर्वत्र मौखिक रूपाने लोकप्रिय झाली आणि नंतरच्या काळात ती संग्रहित करून इ. स. १९३२ मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयाने प्रथम ग्रंथ रूपात प्रकाशित केली. हे ‘चंद्रावती रामायण’ फक्त तीन कांडांचे आहे.
बांगला भाषेतील आदिकवी कृत्तिवास ओझा यांच्या ‘श्रीराम पांचाली’ या महाकाव्यानंतर १०० वर्षांनी चंद्रावतीचा जन्म झालेला आहे. तिचा जन्म ज्या गावी झाला, ते गाव तो भाग फाळणीनंतर सध्या बांगलादेशात गेलेला आहे. गंगेचे अनेक प्रवाह, अनेक मुखांनी ज्या भागात समुद्राला भेटतात, अशा निसर्गरम्य स्थळी चंद्रावती जन्मली व त्या निसर्गात नद्यांच्या प्रवाहामध्ये नौकांमध्ये बसून सख्यांसमवेत विहरण्यात तिचे बालपण गेले. ते सारे निसर्ग संस्कार तिच्या गीतातून उमटलेले आहेत. चंद्रावतीच्या या गीतांना तिच्या जीवनातील घटितांची पार्श्वभूमी आहे. चंद्रावती लावण्यवती, विविध कला निपुण होती. तिच्या गावातीलच एका दयानंद नावाच्या तरुणावर तिचे प्रेम होते. दिसामाशी ते प्रेम फुलत-बहरत गेले. सर्वांच्या संमतीने दोघांचे लग्न ठरले. सारी तयारी झाली, मांडव सजला आणि एके दिवशी चंद्रावतीचा प्रियकर दयानंद अचानक एका मुस्लीम युवतीसमवेत पळून गेला. प्रेमभंगाच्या दुःखाने चंद्रावती उद्ध्वस्त झाली. एकांतात अबोल राहू लागली. चंद्रावतीचे वडील पंडित बन्सीदास भट्टाचार्य हे स्थानिक लोकदेवता ‘मनसादेवी’चे परम भक्त होते. शाक्तपंथीय साधक-उपासक होते. अशाच एका रात्री-पहाटे चंद्रावतीला मनसादेवीचा दृष्टांत, साक्षात्कार होतो आणि ती प्रेमभंगाच्या दुःखावर मात करीत नव्या जोमाने, विश्वासाने आणि स्वाभिमानाने जीवनाला सामोरे जाते. याच काळात ती वडिलांच्या मुखातून रामकथा ऐकते. कृत्तिवासकृत ती रामकथा ऐकून चंद्रावतीला सीतेचे जीवन-समर्पण भावते. सीतेच्या जीवनातील सुख-दुःखे स्वतःच्या अनुभवनिष्ठ शब्दातून ती एकेक गीतामध्ये व्यक्त करते. कवित्वाची ही देणगी तिला उपजत होती, मनसादेवीच्या कृपेने त्या कवित्वाला नवा बहर आला होता. चंद्रावतीने रचलेली ही गीते तिच्या मैत्रिणीद्वारे सर्वत्र प्रसिद्ध झाली. पण, ही सारे गीते मौखिक रूपातच घराघरातून-उत्सवातून दरवळत राहिली.
वाल्मिकी रामायण सप्तकांडत्मक आहे. बांगाली महाकवी कृत्तिवास ओझाचे रामायण सहा कांडाचे आहे. पण, चंद्रावतीचे रामायण फक्त तीन कांडाचेच आहे. त्यामध्ये एकूण ७८९ इतक्या ओव्या-छंद आहेत. या रामायणावरही शाक्तपंथाच्या शक्ती-काली उपासनेचा प्रभाव आहे. मूळ चंद्रावती ही मनसादेवी उपासक आहे. त्या देवीभक्तीचा प्रभाव तिच्या रामगीतांवर आहे. चंद्रावतीला रामाच्या साध्वी सीतेच्या प्रारब्धातील दुःखाचा,उपेक्षेचा, अपमानाचा दबलेला आवाज सर्वांना ऐकवायचा आहे. सीतेच्या दुःखाला, चंद्रावतीच्या स्वतःच्या प्रेमभंगाच्या दारूण, विदारक दुःखाच्या अनुभूतीचा पाया आहे. त्यामुळे चंद्रावतीने गीतातून गायलेली सीतेची दुःखे इतकी करूण व भावकल्लोळाने भारलेली आहेत की, त्यांना लोकगीतांचे स्वरूप प्राप्त झाले. त्यावेळी साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते. चंद्रावतीची रामायण गीते मौखिक पद्धतीने सार्या बंगालप्रांती पसरली.
महाराष्ट्रातील लोकगीतांचा गावरान मेवा मोठ्या परिश्रमपूर्वक साने गुरूजी आणि डॉ. सरोजनी बाबर आदींनी संकलित केला. तसेच, बंगालमध्ये चंद्रावतीच्या गीतांचा सर्वप्रथम लेख लिहिण्याचे काम लोकगीताचे अभ्यासक संशोधक चंद्रकुमार डे यांनी केले. या लेखामुळे अवघ्या अभ्यासकाचे लक्ष या ठेव्याकडे वेधले गेले. कलकत्ता विद्यापीठाने पुढाकार घेऊन इ. स. १९३२ साली चंद्रावती रामायण मुद्रितरूपात, ग्रंथरूप लोकांसमोर आणले. भारताच्या सर्वच भाषांमध्ये लोककथांबरोबरच लोकगीतांची परंपरा व लोकठेवा आहे. बांगलाभाषेतील पहिल्या लोक कवयित्रीचा मान चंद्रावतीला दिला जातो. आपण अलीकडच्या काळातील कवयित्री बहिणाबाई चौधरी या खानदेशी असाक्षर महिलेची आशयघन गीते ऐकून जसे थक्क होतो, अगदी तशीच चंद्रावतीची गीते, रामायण ऐकून बांगालीभाषी लोक आश्चर्यचकित होतात. चंद्रावतीच्या गीतातून व्यक्त होणारी सीतेविषयीची करूण गीते अनेकांना आपल्या दुःखावर फुंकर घालणारी वाटतात.
चंद्रावतीच्या रामायणातील तीन कांडांपैकी पहिले कांड ५६ ओव्यांचे आहे. त्यात ‘रामजन्म’, ‘जनका घरी सीतेचे बालपण’, ‘रामाचे ज्योतिष कथन’, ‘दाम्पत्य सुखाचा अभाव’, ‘धनुष्यभंग’, ‘सीतास्वयंवर’ आणि ‘राम जानकीचा वनवास’ असा कथा भाग आहे. चंद्रावती रामायणाचे दुसरे कांड ‘सीतार बारोमासी’ नावाचे आहे. या कांडात १६२ ओव्या आहेत. बांगला नववर्ष वैशाख महिन्यात सुरू होते. दुसरे कांड वैशाख वर्णनाने सुरू होते. वनवासातील निसर्गात सीता सारे दुःख विसरून कसे आनंदाने पशू-पयी, वृक्ष, लता यांच्या संगतीत हरवून जाते याचे सुरेख वर्णन आहे. सीता रामाला सुवर्णमृग-हरिण मागते, तो कुटीत पाळण्यासाठी, यातून चंद्रावती सीतेची करूणा, पशुप्रेम दर्शवते. हरिण चोळीसाठी मागते अशी अनेक रामायणातील कथा चंद्रावती नाकारते. सीता हरण, रामरावण युद्ध, असा अन्य कथा भाग या कांडात येतो. चंद्रावती रामायणाच्या तिसर्या कांडात उत्तररामायणातील कथा भाग आहे. रामसीतेचे अयोध्या आगमन, राम राज्याभिषेक, राम-सीतेचे सारीपाट खेळणे, सीतेचे गरोदरपण, डोहाळे. सीता रामाला वनवासात राहू वाटते असे डोहाळे सांगते. सीतेचा गृहत्याग, वाल्मिकी आश्रमात आश्रय; असा कथा भाग तिसर्या कांडात येतो. चंद्रावतीचे हे रामायण अपूर्ण आहे, भावपूर्ण आणि आशयघन आहे. हे रामायण सीतेला प्राधान्य देणारे, शक्तीपूजेला महत्त्व देणारे आहे. म्हणून या काव्याला रामायण न म्हणता ‘सीतायन’ म्हणणेच रास्त ठरते. ही एक सुंदर साहित्यकृती आहे.
॥ जय श्रीराम ॥
विद्याधर ताठे
(पुढील लेखात : ओडिशाचे जगमोहन रामायण)