पाच हजार लोककलावंतांच्या मांदियाळीतील अविस्मरणीय प्रजासत्ताक दिन

    02-Feb-2025
Total Views |
Republic Day

भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर विविध राज्यांतील सुमारे ५० हून अधिक लोकनृत्ये ५ हजार, १९९ लोककलावंतांनी नवी दिल्ली येथे ‘कर्तव्यपथा’वर सादर केली आणि या ऐतिहासिक क्षणाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. त्यानिमित्ताने लोककला, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे ‘ज्युरी’ म्हणून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले. त्यानिमित्ताने या अद्भुत, अविस्मरणीय लोकसोहळ्याचे त्यांनी रेखाटलेलेहे अनुभवचित्रण...

देशाच्या राजधानी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘जयति जय मम भारतम्।’ हा आगळावेगळा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे दर्शन ‘कर्तव्यपथा’वर झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून, हात उंचावून या लोकनृत्याच्या सप्तरंगी इंद्रधनुष्याचे कौतुक केले आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे दि. २५ जानेवारी रोजी ५ हजार १९९ लोकनर्तंकांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकार्‍यांसमोर लोकनृत्यांचे विविधरंगी दर्शन घडविले आणि हा ऐतिहासिक क्षण ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविला गेला. ‘ज्युरी’ म्हणून या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार मला होता आले. माझ्यासोबत ‘संगीत नाटक अकादमी’चे उपाध्यक्ष गुजरातच्या लोकसंस्कृतीचे अभ्यासक ‘पद्मश्री’ जोरावर सिंग जाधव हे होते. तसेच, पंजाबचे भोला कलहरी हेदेखील होते. ‘संगीत नाटक अकादमी’च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी या भव्य उपक्रमाची संकल्पना साकारली होती आणि ती प्रत्यक्षात यशस्वीरित्या राबविली गेली. मुख्य नृत्य संरचनाकार तसेच ‘क्युरेटर’ म्हणून त्यांनी हे शिवधनुष्य ‘संगीत नाटक अकादमी’चे अधिकारी आणि भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अधिकार्‍यांबरोबर यशस्वीरित्या पेलले देशभरातील सहा नृत्य संरचनाकार डॉ. संध्या पुरेचा यांच्यासोबत सहकार्य करीत होते. त्यात गुजरातचे कल्पेश दलाल आणि महाराष्ट्राचे सुभाष नकाशे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. देशभरातील एकूण ५० पेक्षा अधिक लोकांवर त्यांचा समावेश या कार्यक्रमात होता. सर्व राज्यांतील लोकनर्तंकांनी अनुक्रमे कोळी, गरबा आणि भांगडा या लोकप्रिय लोकनृत्यांवर ताल धरला होता. ‘जयति जय मम भारतम्’ हे समूहगान पंडित शंकर महादेवन आणि त्यांच्या साथीदारांच्या आवाजामध्ये पार्श्वगायनाच्या स्वरुपात ध्वनिमुद्रित केलेले होते आणि त्यावर लोकनृत्यांचे विलोभनीय दर्शन झाले. हे एक मोठे आव्हान होते, कारण प्रत्येक राज्याची लोकनृत्यशैली वेगळी, संगीत वेगळे, भाषा वेगळी आणि या सगळ्यांचा मेळ घालणे केवळ अहोरात्र सराव करून शक्य झाले, असे संध्या पुरेचा यांनी सांगितले.

‘मी हाय कोळी’ या गाण्यावर सुभाष नकाशे यांनी डॉ. संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व राज्यांतील लोककलावंतांकडून नृत्य बसवून घेतले. महाराष्ट्रातील दीडशेपेक्षा अधिक नर्तक त्यामध्ये सहभागी झाले होते. मोखाडा तालुक्यातील राजन वैद्य यांचे बोहाडा कलावंत, छत्रपती संभाजी नगरच्या दिलीप खंडेराय यांचे कलावंत, पुण्याच्या योगेश देशमुख यांचे कलावंत या उपक्रमात सहभागी झाले होते. देशभरातील लोककलावंतांची निवड करणे आणि कलाप्रकारांची निवड करणे हे खरं तर मोठे आव्हान होते. विशेषतः ज्यावेळी लंडनवरून प्रवीण नावाचे ‘गिनीज बुक’चे प्रतिनिधी आले. त्यांना कोळी नृत्य, गरबा नृत्य आणि भांगडा नृत्य यांची माहिती देताना त्यातील सत्यतेवर अवगत करणे, हे मोठे काम होते. ती नृत्ये पारंपरिक आहेत का, त्या नृत्यांचे संगीत पारंपरिक आहे का, त्या नृत्यांची प्रस्तुती करताना काही इतर नृत्यप्रकार घुसडले नाहीत ना, या सर्व प्रश्नांची सरबत्ती ‘गिनीज बुक’च्या अधिकार्‍यांनी केली आणि त्यांना यशस्वी उत्तरे देण्याचे काम संध्या यांनी केले.

लोकनृत्याच्या या महाकुंभात राज्यांच्या नृत्यांची विविधता होती. ईशान्येकडील राज्यांमधील प्राण्यांचे मुखवटे घातलेली नृत्ये, आसामचे ‘बिहू बोडो’, बिहारचे ‘जेजिया’, छत्तीसगढचे ‘गौड माडिया’, गोव्याचे ‘समई’ नृत्य, गुजरातचे ‘डांगी’ नृत्य, ‘गरबा’, हरियाणाचे ‘घूमर’, हिमाचल प्रदेशचे ‘नाटी’ नृत्य, झारखंडचा ‘पैका नाच’, आंध्राचे ‘करगूलू’, तामिळनाडूचे ‘करघम’, बंगालचे ‘पुरुलिया छाव’, मणिपूरचे ‘कबोई नागा’, मेघालयचे ‘वांगला’, ओडिशाचे ‘संबल पुरी’, पंजाबचे ‘भांगडा’, राजस्थानचे ‘कलबेलिया’, उत्तर प्रदेशचे ‘फरवाई’, उत्तराखंडमधील ‘छापेली’, जम्मू-काश्मीरचे ‘रॉफ’, मध्य प्रदेशचे ‘बधाई’, लडाखचे ‘मिटॉक फ्लॉवर’, त्रिपुराचे ‘संग्राईन मोग’ असे वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे नृत्य प्रकार भारतीय भावनेत गुंफले होते. यातील काही विधीनृत्ये होती, काही कृषिनृत्ये होती, काही रंजनपर नृत्ये होती, काही सण-उत्सवांची नृत्ये होती. सुभाष नकाशे म्हणाले, “मी बरीचशी नृत्ये आधी पाहिली होती. त्यामुळे नृत्यसंरचना करणे सोपे गेले.” सुभाष नकाशे यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’सह अनेक कार्यक्रमांचे नृत्यदिग्दर्शन केलेले आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर अन्य राज्यांमध्येदेखील लोकनृत्यांत विविधता आहे, असे ते म्हणाले.

प्रत्यक्ष ज्युरी म्हणून काम करताना एक वेगळाच अनुभव आला. विविधतेत एकता असते, हे सूत्र नव्याने उमगले. प्रत्यक्ष पारंपरिक नृत्य आणि संरचना केलेले नृत्य यांतील फरकही कळले. पारंपरिक लोकनृत्याचे जतन, संवर्धन करायचे असेल, तर मूळ लोकनृत्य माहीत असणे गरजेचे आहे. त्यामागचे पर्यावरण माहीत असणे गरजेचे आहे. मग लोकनृत्यातील तोच तोचपणा आणि पसरटपणा नृत्य संरचनेने टाळता येईल. एकूणच ‘गिनीज बुक’मध्ये इतक्या मोठ्या संख्येने भारताची लोकनृत्ये नोंदविण्यात आल्यामुळे एक वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री, पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. चावला, संयुक्त सचिव उमा नांदुरी, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘संगीत नाटक अकादमी’च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा आणि सचिव राजू दास या लोकनृत्य महाकुंभासाठी अभिनंदन पात्र आहेत.