'बिग बॉस मराठी ५' चा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
02-Feb-2025
Total Views |
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर घोषणा करत ‘बिग बॉस मराठी ५' च्या पुनःप्रक्षेपणाची माहिती दिली आहे. १० फेब्रुवारीपासून दररोज दुपारी ३ वाजता हा लोकप्रिय शो प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे. सध्या चर्चा आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची. या सिझनची का चर्चा रंगण्या मागचं कारण म्हणजे या गाजलेल्या सिझनचे सर्व एपिसोड्स तुम्ही टीव्हीवर परत पाहू शकता. आता हा सिझन पुन्हा एकदा टेलिकास्ट होत आहे. यावेळी या सिझनची बरीच चर्चा होती, तेव्हा प्रेक्षकांसाठी या सिझनचा आनंद आता ते पुन्हा घेऊ शकतात. या सिझनमधील सर्वच एपिसोड हे गाजले होते.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली होती. तब्बल ७० दिवस चाललेल्या या रिअॅलिटी शोमध्ये १७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने केलं होतं. त्याच्या खास शैलीत दिले जाणारे ‘भाऊचे धक्के’ हा शोच्या चर्चेचा मुख्य विषय ठरला होता. कोणाला समज दिली जाईल, कोणाची ‘शाळा’ घेतली जाईल, याची उत्सुकता प्रेक्षकांना कायम राहिली.
या पर्वात सुरुवातीपासूनच वाद आणि गोंधळ पाहायला मिळाले. सदस्यांमधील वाद, मैत्री, आणि खेळी-मेळीने या सीझनने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन केले. काही स्पर्धक मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले, तर काहींनी प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, टीआरपीच्या बाबतीतही ‘बिग बॉस मराठी ५' ने नवा इतिहास रचला. शोच्या एकूण लोकप्रियतेमध्ये रितेश देशमुखच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने मोठा वाटा उचलला.
शोमध्ये अनेक नवी नाती तयार झाली. कुणी खास मित्र झाले, तर कुणी भाऊ-बहीण म्हणून एकत्र आले. या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला, तर अभिजीत सावंत उपविजेता आणि निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानावर राहिली. आता हा धम्माल आणि रोमांच पुन्हा अनुभवायला मिळणार आहे! त्यामुळे पुन्हा एकदा तोच उत्साह, तीच धम्माल आणि ‘भाऊचे धक्के’ अनुभवण्यासाठी तयार राहा!