आमिर खानसोबत 'गजनी २' करायची इच्छा : निर्माता अल्लू अरविंद यांची घोषणा!

    02-Feb-2025
Total Views |

amir khan


मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद यांनी बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानसोबत गजनी २ बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवलेल्या गजनी या चित्रपटाचे ते सादरकर्ते होते. ए. आर. मुरुगदॉस यांनी दिग्दर्शित केलेला हा मानसशास्त्रीय ॲक्शन थ्रिलर तमिळ सुपरस्टार सूर्या यांच्या गजनी या चित्रपटाचा अधिकृत हिंदी रीमेक होता.
गजनी हा २०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. त्या काळात १०० कोटींचा आकडा गाठणे अशक्य मानले जात होते. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमिरने सांगितले होते की हा १०० कोटींचा आकडा पार करणारा पहिला चित्रपट ठरेल, आणि ते खरे ठरले," असे अरविंद यांनी थंडेल चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर लाँच कार्यक्रमात सांगितले. "आज १०० कोटींचे महत्त्व १००० कोटींइतके आहे. त्यामुळे मी आमिरसोबत एक १००० कोटींचा चित्रपट करायचा विचार करतोय, कदाचित ‘गजनी २" असे अरविंद म्हणाले.
आमिरने अरविंद यांना मोठा भाऊ मानत त्यांचे कौतुक केले. "ते जे काही करतात, ते नेहमी मनापासून करतात. त्यांच्या नव्या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर लॉन्चसाठी मी आनंदाने उपस्थित राहिलो," असे खान यांनी सांगितले.
थंडेल आणि जुनैद खानचा ‘लव्हयप्पा’ एकाच दिवशी प्रदर्शित :
अरविंद यांच्या थंडेल या नव्या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर लाँच प्रसंगी आमिर खान याने चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली. "थंडेलचे कथानक खूप रोमांचक आहे. मी या चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे," असे आमिर म्हणाला.
विशेष म्हणजे, थंडेल आणि आमिर खान याचा मुलगा जुनैद खान याचा लव्हयप्पा हे दोन्ही चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहेत. "चांगली कथा असेल, तर चित्रपट हमखास चालतो. त्यामुळे दोन्ही चित्रपट चांगले प्रदर्शन करतील," असा विश्वास आमिर खानने व्यक्त केला.
'थंडेल' एका सत्य घटनांवर आधारित प्रेमकथा :
नागा चैतन्य आणि सई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला थंडेल हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. एका मच्छीमाराची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटात नायक चुकून पाकिस्तानी जलसीमेत पोहोचतो आणि तेथील तुरुंगात कैद होतो. चंदू मोंडेती यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.