मुंबई : प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने 'इंडियाज गॉट लॅटेंट' शोवरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे आपल्याविरोधात मुंबई आणि आसामच्या गुवाहाटी येथे दाखल झालेल्या एफआयआर एकत्रित करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटिस्वर सिंग यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. यामध्ये अलाहबादियाने अटक होऊ नये यासाठी तात्पुरते संरक्षण देण्यात आले आहे. रणवीर अल्लाबादियाच्या बाजूने माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचे पुत्र आणि ज्येष्ठ वकील अभिनव चंद्रचूड यांनी युक्तिवाद केला.
रणवीर अलाहबादियाने प्रसिद्ध विनोदी कलाकार समय रैना याच्या यूट्यूब शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' मध्ये दिलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे हा वाद उफाळून आला. यानंतर त्याच्यासह शोमधील इतर सदस्यांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. शोमध्ये सहभागी असलेल्या विनोदी कलाकार जसप्रीत सिंग, कंटेंट क्रिएटर अपूर्वा मुखीजा (द रिबेल किड), यूट्यूबर आशिष चंचलानी आणि शोच्या निर्मात्यांविरोधात देखील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
रणवीर अलाहबादियाने आपल्या वक्तव्याबद्दल दोन वेळा जाहीर माफी मागितली आहे. त्याने सोशल मीडियावर सांगितले की, त्याला प्राणघातक धमक्या मिळत आहेत. विनोदी कलाकार समय रैना याने या प्रकरणामुळे मानसिक तणाव वाढल्याचे सांगत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे.
कंटेंट क्रिएटर अपूर्वा मुखीजा हिने मुंबई पोलिसांसमोर हजर राहून आपला जबाब नोंदवला आहे. समय रैनाने इंडियाज गॉट लॅटेंट च्या सर्व भागांना यूट्यूबवरून हटवले आहे. या शोला लाखो व्ह्यूज मिळाले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.