मुंबई : 'साहेब मला माफ करा' असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाने त्यांना सोडचिठ्ठी दिली आहे. उबाठा गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी जितेंद्र जनावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते उबाठा गटाचे विलेपार्ले येथील उपविभाग प्रमुख पदावर कार्यरत होते. येत्या २० फेब्रुवारी रोजी ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ‘उबाठा’ गटाचे आमदार तथा माजी मंत्री अनिल परब यांना कंटाळून जितेंद्र जनावळे यांनी राजीनामा दिला. त्याआधी त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
“गेली सहा वर्षे कार्यक्षेत्राबाहेर नियुक्त करून, माझी राजकीय कोंडी करण्याचे षडयंत्र विभागातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून रचले गेले. गेल्या पालिका निवडणुकीत मी नोकरी आणि घर सोडून भाजपच्या विरोधात जोमाने लढलो. पण विभागप्रमुख अनिल परब यांनी मला शेजारच्या विधानसभा क्षेत्रात म्हणजे बाहेर ठेवले. वारंवार विनंती केल्यानंतरही त्यांनी फक्त तारखा दिल्या आणि निराशा केली. मी वास्तव्यास असलेल्या विलेपार्ले विधानसभेच्या बैठकांमध्ये अपमानही करण्यात आला. मला डावलण्यासाठी हे प्रकार जाणीवपूर्वक केले जात होते, हे मला जाणवत होते. तरीही मी सहा वर्षे संयम ठेऊन संघटना वाढीसाठी काम करीत राहिलो,” असे जनावळे यांनी पत्रात लिहिले आहे.
संघटना चुकीच्या वळणावर
“या बाबत मी आपल्याला आणि आदित्य ठाकरे यांना मातोश्री येथे प्रत्यक्ष भेटून विभागात चुकीच्या पद्धतीने चाललेल्या संघटनात्मक कामांबद्दल व्यथा मांडली. परंतु, आपणाकडून यावर काहीच तोडगा निघालेला नाही. या चुकीच्या पद्धतीला मी कंटाळलो असून, जड अंतःकरणाने माझ्या पदाचा राजीनामा आपणाकडे या पत्राद्वारे देत आहे”, असे जनावळे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.