लखनऊ : उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील मुसाफिरखान पोलीस ठाणे परिसरातील औरंगाबाद गावात असलेल्या १२० वर्षे जुन्या पंच शिख मंदिरात २० वर्षानंतर पूजा करण्यात आली. प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात आणि कडक पोलीस बंदोबस्तामध्ये रविवारी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी मंदिरात वैदिक मंत्रांचा जप करत पूजा करण्यात आली. भाविकांची मोठी गर्दी जमली आणि संपूर्ण परिसर हरहर महादेवच्या जयघोषाने दुमदूमला.
प्रसारमाध्यमानुसार, संबंधित मंदिर हे १२० वर्षांपूर्वी वंचित समाजातील एका जेठूरामने बांधले होते. परंतु गेल्या २० वर्षांपासून मंदिरावर कट्टरपंथींनी अतिक्रमण केले होते. पंच शिखर शिव मंदिराच्या मुक्ततेसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आवाहन केले होते. त्यानंतर आता कारवाई करण्यात आली. यानंतर आता भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे.
पूजा पूर्ण झाल्यानंतर, भाविकांनी याला सनातन धर्माचा विजय असल्याचे म्हटले आहे. मंदिराच्या परिसरामध्ये पीएसीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सीओ मुसाफिरखाना अतुल सिंह आणि तहसीलदार स्वत: घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान, भाजपचे जिल्हा मंत्री अतुल सिंह म्हणाले की, हा हिंदू समाजाच्या धार्मिक श्रद्धेचा विजय आहे. त्याच वेळी, एका वृद्ध भाविकाने अनेक वर्षानंतर मंदिरात देवाची पूजा केल्याचा आनंद व्यक्त केला. त्यामुळे एक अभिमानास्पद भावना त्यांनी व्यक्त केली होती.