शोध अन् बोधाचे कलोपासक

15 Feb 2025 11:02:08

chandrakant ghatge
 
निसर्गातील अविष्कार व वैविध्यपूर्ण जनजीवन कॅमेर्‍यात टिपण्यासह कुंचल्याच्या साहाय्याने चितारून, बोधन करणारे शोधक कलोपासक चंद्रकांत घाटगे यांच्याविषयी...
 
मुंबईत नशीब आजमवण्यासाठी कोकणच्या लाल मातीतून आलेल्या चंद्रकांत तुकाराम घाटगे या चाकरमान्याचा जन्म, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधील कुडुक खुर्द या गावी झाला. निसर्गरम्य कोकणातील कौलारू घरात आजी, आजोबा, आईवडील आणि काका, आत्या असे एकत्रित कुटुंब होते. त्यामुळे लाडाकोडात वाढलेल्या चंद्रकांत यांचे बालपण हुंदडण्यात गेले. एक भाऊ पाच बहिणी असा त्यांचा मोठा परिवार, वडील मुंबईत नोकरीला आणि कुटुंब गावी. गावात चौथीपर्यंतच शाळा असल्याने वडिलांनी त्यांना दुसरीला असताना, मुंबईला आणून मनपाच्या शाळेत घातले. खानावळीत जेवणे आणि चाळीच्या गॅलरीत झोपणे, असा दिनक्रम सुरू असायचा. पुढे सिद्धार्थ कॉलेजला जाऊ लागल्यावर, वडिलांना स्टाफ क्वार्टर्स मिळाले. कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना, गावाहून संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. चंद्रकांत यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्याने आणि परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमधील चित्रकलेचे वाडेकर सर व नाबर सर यांनी प्रोत्साहन दिल्याने, त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. तेथील ‘फाऊंडेशन कोर्स’च्या परीक्षेत ते प्रथम श्रेणीने ते उत्तीर्ण झाले. जे जे महाविद्यालयामधील दत्तात्रेय पाडेकर, शांताराम पवार, फोटोग्राफीचे जतकर सर हे आपल्या कमर्शियल आर्टसचे गुरु असल्याचे ते सांगतात.
 
घरात त्यावेळी कमावते हात दोन आणि खाणारी तोंडे दहा, यामुळे आर्थिक परिस्थिती तशी कमकुवत होती. घरात हातभार लागावा त्याकरिता त्यांनी, मुंबईतच ’ज्युनिअर आर्टिस्ट’ म्हणून २०० रुपये पगाराची पहिली नोकरी केली. त्यानंतर मुंबई मनपामध्ये लिपिक म्हणून रुजू झाले. पालिकेत काम करीत असताना, बाहेरून बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नोकरीत पदोन्नती घेत, महापालिकेच्या ’असिस्टंट सेसर अ‍ॅण्ड कलेक्टर’ या पदापर्यंत पोहोचले. सचोटीने काम करून वयोपरत्वे सेवानिवृत्ती स्वीकारली. नोकरीत असताना फावल्या वेळेत फोटोग्राफी आणि पोस्टर डिझाईनचे काम, त्याचबरोबर डेकोरेशनचेही काम करून आमदनीसह आपला छंदही त्यांनी जोपासला. रांगोळीतदेखील त्यांचा हातखंडा आहे.
 
भारतातील अनेक राज्ये आणि विदेशातही त्यांना फिरण्याचा योग आला. त्यामुळे तेथील विविधता पाहून, त्यांची फोटोग्राफी प्रगल्भ होत गेली आणि सामाजिक ज्ञानात भर पडल्याने, त्यांचे प्रबोधनात्मक विचार दृढ झाले. मजल दरमजल करत केलेल्या हटके फोटोग्राफी आणि पोस्टरकलेला त्यांनी नवे आयाम दिले. त्यामुळे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. मुंबई महापालिकेच्या ‘स्वच्छ मुंबई-हरित मुंबई’ या रंगावली स्पर्धेत त्यांनी, सुवर्णपदक पटकावले. सिद्धार्थ कॉलेजला असताना ‘एनसीसी’चे बेस्ट कॅडेट होते. उत्तम टेबल टेनिसपटू होते. मुंबई महापालिकेच्या क्रीडा भवनात पाच वर्षे सचिव म्हणून काम करताना त्यांनी, अनेक खेळाडू घडवले. शाळा, कॉलेजमध्ये नाटकातही ते सहभाग घेत असत. निवृत्तीनंतरही स्वस्थ न बसता, संगीत आणि गाण्याचा छंद जोपासत असल्याचे ते सांगतात.
 
शालेय जीवनापासूनच कविता आणि लेखनाची आवड होती. त्यामुळे आजवर सहा पुस्तकांचा जन्म झाला. त्यातील ‘हे तथागथा’ या कवितासंग्रहाला तीन पुरस्कार मिळाले. त्यांचा ‘बेधडक’ हा लेखसंग्रह सध्या चर्चेत आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श आहेत. संविधानिक वाटेने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जपत सामाजिक कार्यातदेखील हिरिरीने भाग घेत, तालुका आणि जिल्हास्तरीय अनेक संस्थामध्ये त्यांनी पदाधिकारी म्हणून जबाबदारीने काम केले आहे. मंडणगड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची उभारणी तसेच, महाड तालुक्यातील ‘भेलोशी पंचक्रोशी शिक्षण संस्थे’चे हायस्कूल उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना सामाजिक क्षेत्रातले अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले. मुंबईत पार पडलेल्या मराठी साहित्य संगितीचे दोन वेळा प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले.
 
‘महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन’, ‘ललित कला अकादमी’, ‘कॅग’, ‘रोड सेफ्टी’, ‘महाराष्ट्र नशाबंदी विभाग’, ‘कलासाधना’, ‘फ्रेंडस ऑफ द ट्रीज संस्था’ तसेच, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी व कला प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला. आजवर ‘शोधन’ आणि ‘प्रबोधन’ अशी चार चित्र व फोटो प्रदर्शने त्यांनी भरवली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक’ ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, ‘भेलोशी पंचक्रोशी शिक्षण संस्था’, ता. महाड, मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन, फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई, ‘नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंडस् ऑफ द ट्रीज, मुंबई’ या संस्थांचे ते आजीव सभासद आहेत. सामाजिक काम करताना फोटोग्राफी, पोस्टर डिझाईन आणि लेखनाद्वारे समाज प्रबोधन करण्याचे ध्येय त्यांनी, आजवर जपले आहे. “नवीन पिढीने बटबटीत माध्यमांच्या आहारी न जाता, आपल्यातील कलागुण हेरून कला विकसित करावी. आपणापुढे पूर्वीपेक्षा आता मोठे अवकाश खुले आहे. तेव्हा उंचच उंच भरारी घेऊन, जीवनाचा आनंद घ्या आणि इतरांनाही आनंद द्या,” असा संदेश युवापिढीला देणारे चंद्रकांत घाटगे यांना पुढील वाटचालीस, दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0