रत्नागिरी : ज्यादिवशी एकनाथ शिंदे तोंड उघडतील त्यावेळी उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावे लागेल, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी केले. रत्नागिरी येथे आयोजित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत ते बोलत होते.
रामदास कदम म्हणाले की, "कोकण ही शिवसेना प्रमुखांची भूमी आहे. माझ्या कोकणी माणसांनी शिवसेना मोठी केली. आम्ही सबंध कोकण पिंजून काढून भगवामय केले. उद्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा असेल, हे मी सांगतो. एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला होता तेव्हा ४० पैकी एकाही आमदाराला निवडून येऊ देणार नाही, अशी शपथ उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तेव्हा खोके-खोके असे म्हणून बाप बेटे थकले. पण ज्यादिवशी आम्ही एकनाथ शिंदे आणि रामदास कदम तोंड उघडू तेव्हा उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावे लागेल. आम्ही मातोश्रीमध्ये अनेक मिठाईचे खोके पोहोचवले. एकनाथ शिंदे साहेबांनी विकास कामांसाठी खोके दिले आणि पुन्हा ४० पैकी ४० आमदार निवडून आणले," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - कोकणात उबाठा गटाला खिंडार! माजी आमदार सुभाष बने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
...तर शिवसेना फुटली नसती!
"उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना काळीमा फासली. त्यांचे विचार पायदळी तुडवण्याचे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण त्यांनी नारायण राणे, मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवले. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसालाही त्यांनी नेता करून महत्व प्राप्त करून दिले. मात्र, शिवसेना प्रमुखांनी जे कमावले ते सगळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेऊन गमावले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. मी हे जबाबदारीने बोलतोय. ताकाल येऊन गाडगे लपवण्याची आवश्यकता नाही. हे वास्तव आहे," असेही रामदास कदम म्हणाले.