महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला शिखरावर नेणाऱ्या केसरी पाटील यांचे निधन

९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    15-Feb-2025
Total Views |
keasar
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला पर्यटनाचे वेड लावणारे, पर्यटन व्यवसायाचे आधारस्तंभ म्हणून ओळख असलेले केसरी टूर्सचे संस्थापक अध्यक्ष केसरीनाथ पाटील यांचे शनिवारी वृध्दापकाळाने निधन झाले. अवघ्या महाराष्ट्राला ते केसरी पाटील म्हणून सुविख्यात होते. एका छोट्या गावातून येऊन जिद्दीच्या जोरावर पर्यटन व्यवसायातील अग्रगण्य संस्थेची उभारणी करतो हा केसरी पाटील यांचा प्रवास थक्क करणारा होता. शनिवारी त्यांचे पार्थिव वांद्रे येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल पर्यटन क्षेत्रातील, तसेच उद्योगक्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. पर्यटन क्षेत्रातील आधारवड हरपला अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
 
केसरीयांनी सफाळ्याजवळील मथाने गावात जन्माल्यावर सुरुवातीला शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर सर्वसामान्यांना त्यांना परवडणाऱ्या दरांत जग फिरता यावे म्हणून पर्यटक देवो भव या संकल्पनेला समोर ठेवून त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देत प्रचंड कष्ट करत त्यांनी केसरी टूर्सचे नाव व व्यवसायाची वृध्दी केली. आज जगभर नाव झालेल्या पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये केसरी टूर्सचे नाव घेतले जाते. यामागे केसरी पाटील यांचीच मेहनत कारणीभूत आहे.
 
 
 
 
मराठी माणसाच्या मनात पर्यटनाची आवड रुजवून जगभर फिरण्याची सवय लावणारे केस़रीनाथ पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचा दीपस्तंभ अस्तंगत झाला आहे अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरी पाटील यांना श्रध्दांजली वाहली आहे.