इस्लामाबाद : पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये (Pakistan bomb blast) किमान ११ कामगार ठार झाले आहेत. तसेच ६ जण जखमी झाल्याचे गंभीर वृत्त समोर आले आहे. सरकारी अधिकाऱ्याने यासंबंधित माहिती शुक्रवारी दिली. अधिकारी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेत आहेत. या प्रकरणात चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरनाई जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यामध्ये ११ कामगार ठार झाले आहेत, तर ६ जण जखमी असल्याचे शहजाद झहरी यांनी एएफपीला सांगितले. हे कामगार त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून बाजारामध्ये खरेदीसाठी जात असताना एका आईईडी असलेल्या स्फोटकाने भरलेल्या वाहनाने धडक दिली आणि त्यावेळी स्फोट झाला. त्यावेळी पाकिस्तानातील नैऋत्य भागामध्ये बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टापासून १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या हरनाई जिल्ह्यात हा हल्ला झाला आहे. कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारली नसली तरी, सुरक्षा दलांवर आणि बलुचिस्तान नसलेल्या रहिवाशांवर विषेशत: पंजाबी लोकांवर प्राणघातक हल्ले करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बलुचिस्तान लिहरेशन आर्मीचा या प्रदेशामध्ये अशाचप्रकारे करण्यात आलेल्या हल्ल्यांचा इतिहास आहे.