India’s Got Latent : "विनोदी नट म्हणून तुम्ही....", जेष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी अश्लील विनोदावर दर्शवला तीव्र विरोध!

12 Feb 2025 14:17:27


VIJAY PATKAR

मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या अलीकडच्या एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला. या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारल्याने, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणावरुन सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
 
या प्रसंगावरुन मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी 'मुंबई तरुण भारत' ला दिलेल्या प्रतिक्रियेत अश्लील विनोदावर विरोध दर्शवला. ते म्हणाले की,"विनोद निर्मितीची मर्यादा ओलांडली जात असेल, सामाजिक भान विसरत असतील तर, ते साफ चुकीच आहे. बऱ्याचदा स्टँडअप कॉमेडी करताना विनोदांवर भान राहत नाही कारण स्टँडअप कॉमेडी ही लिखित स्वरूपाची नसते. ती प्रसंगावरून अथवा प्रेक्षकांवरुन केली जाते. असं जरी असलं तरी प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जातील असं काहीही बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही."
 
मात्र या बाबतीत मराठी कलाकार सगळ्या गोष्टीच अगदी व्यवस्थित भान ठेवून विनोद निर्मिती करतात. देव, धर्म, जात, रंग-रूप, या सगळ्या गोष्टीच भान ठेवून मराठी कलाकार निखळ विनोद निर्मिती सादर करत असतो. मुळातच आपला हिंदू आणि मराठा समाज आगाऊ नसल्याने मराठी कलाकाराने कुठे भान ठेवले पाहिजे हे प्रत्येक मराठी कलाकाराला बरोबर कळते. पण मराठी इंडस्ट्री मध्येही कुठेतरी कंबरेखालचे विनोद व्हायला लागले आहेत. याची काहीही गरज नाही कारण आमच्या वेळी आम्ही असे विनोद न करताच प्रेक्षकांना खळखळून हसवलय."
 
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना, तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आणि या प्रकरणी आपली बाजू मांडण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर 'इंडियाज गॉट लेटेंट' शोवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. या शोच्या आयोजकांविरुद्ध कठोर कारवाईचीही मागणी केली जात आहे.


Powered By Sangraha 9.0